फोटो- इस्लामपूर येथील नायब तहसीलदारांना डॉ. संग्राम पाटील, प्रल्हाद माळी, सुजितकुमार कांबळे, संग्राम पाटील यांनी निवेदन दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : उरुण परिसरातील सर्व्हे क्रमांक १० आणि ४ मधील जागेचे ऑनलाईन उतारे त्वरित दुरुस्त करून ऑनलाईन सात-बारा उतारे चालू न केल्यास आंदोलन करू, असा इशारा नगरसेवक डॉ. संग्राम पाटील यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी येथील तहसील कार्यालयास दिले आहे.
निवेदनात वरील दोन्ही सर्व्हे क्रमांकांची फाळणी झालेली नाही. हे क्षेत्र ४० एकरचे आहे. या दोन सर्व्हे क्रमांकांमध्ये महादेवनगर, कर्मवीरनगर, राजेबागेश्वरनगर, बहे नाका असा गावठाणातील मोठा भाग समाविष्ट आहे.
शासनाच्या नियमानुसार ऑनलाईन सात-बारा सक्तीचा केलेला आहे. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना कसलेही कर्ज मिळत नाही. खरेदी-विक्री करणे, वारस नोंद, आणेवारी दुरुस्ती अशा बाबी होत नाहीत. तसेच बऱ्याच नागरिकांनी कलम १५५ अन्वये सात-बारा दुरुस्तीसाठी अर्ज केले आहेत.
गेल्या पाच वर्षांपासून हे अर्ज निकाली काढलेले नाहीत. तलाठी कार्यालयात हेलपाटे मारून नागरिक त्रस्त झाले आहेत. येथील नागरिक कागदपत्रांसह सहकार्य करण्यास तयार आहेत. त्यामुळे वरील सर्व्हे क्रमांक १० आणि ४ मधील ऑनलाईन सात-बारा उतारे देण्यासाठी आठ दिवसांच्या आत सुनावणी घेऊन हे उतारे चालू करावेत अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन करू, असे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
यावेळी प्रल्हाद माळी, सुजितकुमार कांबळे, संग्राम सीताराम पाटील उपस्थित होते.