लोकमत न्युज नेटवर्क
विटा : वृक्षमित्र धों. म. मोहिते यांनी देशातील पहिले मानवनिर्मित सागरेश्वर अभयारण्याची उभारणी करून ते नावारूपाला आणले. त्यांचे हे सामाजिक कार्य दीपस्तंभासारखे असून ते नव्या पिढीला दिशादर्शक ठरेल, असा विश्वास कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला.
मोहित्यांचे वडगाव (ता. कडेगाव) येथे गावचे सुपुत्र व मानवनिर्मित सागरेश्वर अभयारण्याचे जनक थोर स्वातंत्र्यसैनिक वृक्षमित्र धो. म. मोहिते (आण्णा) यांच्या स्मृतीदिनानिमीत्ताने मंगळवारी कृषी राज्यमंत्री डॉ. कदम यांनी धों. म. मोहिते यांच्या घरी भेट देऊन आण्णांंच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, युवा नेते डॉ. जितेश कदम, ताकारीचे सरपंच अर्जुन पाटील, सरपंच विजय मोहिते उपस्थित होते.
मंत्री डॉ. कदम यांनी अभयारण्य उभारणीच्या काळातील फोटोंची पहाणी केली. त्यामुळे स्व. यशवंतराव चव्हाण व शरद पवार यांच्या आठवणीना उजाळा मिळाला. त्यानंतर वृक्षमित्र धों. म. मोहिते यांना सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल विविध क्षेत्रात मिळालेल्या पुरस्कारांची माहिती घेतली.
यावेळी प्रा. रोहित मोहिते यांनी वृक्षमित्र आण्णांनी लिहिलेले ''कथा सागरेश्वर अभयारण्याची'' हे पुस्तक देऊन मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांचा सत्कार केला.
या कार्यक्रमास रानकवी सु. धों. मोहिते, बाळासाहेब मोहिते, पांडुरंग मोहिते, विनायक महिंद, तंटामुक्ती अध्यक्ष विकास मोहिते, उपसरपंच राजेंद्र मोहिते, वसंत मोरे, जयंत पवार, सर्जेराव मोहिते, सचिन मोहिते आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.