संख : भीषण दुष्काळी परिस्थितीने जत तालुक्यातील ३००० एकर क्षेत्रातील डाळिंब बागा पाण्याअभावी वाळून गेल्या आहेत. बागा काढण्याशिवाय कोणताही पर्याय राहिलेला नाही.
अनुकूल हवामान, कमी पाण्यात व खडकाळ जमिनीवर येणारे फळबागेचे डाळिंब पीक आहे. ठिबक सिंचन, शेततलाव, कूपनलिका खोदून उजाड माळरानावर बागा फुलविल्या आहेत. गणेश, केशर, भगवा वाणाच्या बागा आहेत. बाजारात भाव चांगला मिळत असल्यामुळे केशर जातीच्या बागांचे प्रमाण अधिक आहे. तालुक्यामध्ये डाळिंबाचे क्षेत्र ११ हजार ३४४.५९ हेक्टर आहे. दरीबडची, उमदी, सोन्याळ, जाडरबोबलाद, उटगी, आसंगी (जत), दरीकोणूर, वाळेखिंडी, काशिलिंगवाडी या परिसरात डाळिंब क्षेत्र अधिक आहे.
तालुक्यात २६ पाटबंधारे व साठवण तलाव, २ मध्यम प्रकल्प आहेत. अनेक शेतकºयांनी तलावातून तसेच तलावाशेजारी ओढ्यालगत विहीर खोदून पाईपलाईन करून पाणी आणले. मात्र यावर्षी ४८.३ मि.मी. पाऊस झाला आहे. त्यामुळे १६ तलाव कोरडे पडले आहेत, तर संख, दोड्डनाला मध्यम प्रकल्पातील पाणी पातळी मृत संचयाखाली गेली आहे.
पश्चिम भागातील तलावांना म्हैसाळ योजनेचे पाणी आले आहे. सध्या तलावातील पाणीसाठा ६ टक्के शिल्लक आहे. हा साठा ३१४.४६ द.घ.ल.फू आहे. पूर्व भागातील अंकलगी तलाव वगळता सर्व तलाव चार महिन्यांपूर्वीच कोरडे पडलेले आहेत. पाण्याची पातळी ८०० ते ९०० फुटापर्यंत गेली आहे. विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत.
जानेवारीपासून पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. डाळिंब बागांना गेल्या तीन महिन्यांपासून पाणी मिळालेले नाही. त्यामुळे बागा पूर्णपणे वाळून गेल्याने फक्त सांगाडेच राहिले आहेत. परिणामी बागायतदारांसमोर बागा काढून टाकण्याशिवाय दुसरा पर्यायच राहिलेला नाही.