सांगली : कोयना धरणात १२.३७ टीएमसी, तर वारणा धरणात ११.७६ टीएमसी पाणीसाठा आहे. पाणीसाठा अत्यंत कमी असल्यामुळे त्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे आहे. त्यामुळे कृष्णा नदीतून पाणी उपसा करण्यासाठी दि. १४ ते १७ जूनपर्यंत उपसा बंदी आदेश लागू केला आहे. या कालावधीत पाणी उपसा केल्यास पाणी व विजेचा परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा सांगली पाटबंधारे मंडळाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी दिला आहे.देवकर म्हणाल्या, पावसाळा लांबल्यामुळे व धरणातील पाणीसाठा अत्यल्प असल्याने कोयना धरणातून १०५० क्युसेक विसर्ग सुरू आहे. ताकारी योजना बंद केली असून टेंभू व म्हैसाळ योजनांचे आवर्तन अंशत: सुरू आहे. नदीकाठावरील लाभधारकांकडून सिंचन, बिगर सिंचनासाठी पाणी उपसा सुरू आहे. कृष्णा नदीपात्रातील पाणीपातळी कमी होऊन सिंचन व पिण्यासाठी पाणी अपुरे पडत आहे.धरणामधील उपलब्ध पाणीसाठा, तापमानातील वाढ विचारात घेता, पावसाळ्यापर्यंत पाणी पुरविणे अत्यावश्यक आहे. कृष्णा नदीमधून दि. १४ ते १७ जूनपर्यंत शेतीसाठी उपसा करणाऱ्या सर्व योजनांवर उपसा बंदी आदेश लागू केला आहे. दि. १८ ते २० जूनपर्यंत पाणी उपसा करता येणार आहे. पिण्याच्या पाणीपुरवठ्याशिवाय इतर कारणांसाठी कृष्णा नदीतून पाणी उपसा केल्यास उपसा अनधिकृत समजून, पाणी परवाना व विद्युत पुरवठा एक वर्षाकरिता रद्द करणार आहे. उपसासंच सामग्री जप्त करून पुढील कारवाई करण्यात येईल.
सूक्ष्म सिंचनाचा वापर कराउपलब्ध होणाऱ्या पाण्यावर लाभक्षेत्रातील उभी असणारी पिके जोपासण्यासाठी आधुनिक सूक्ष्म सिंचनाचा वापर करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी काटकसरीने पाण्याचा वापर करून फक्त उभ्या पिकांचे नुकनास होऊ नये, यादृष्टीने नियोजन करावे.
सांडपाणी, औद्योगिक वापरातील पाणी नदीत सोडू नकावारणा, कृष्णा नद्यांमधील मर्यादित पाणीसाठ्याचा विचार करून सांडपाणी, औद्योगिक वापरातील पाणी थेट नदीत सोडून पाणीसाठा प्रदूषित करू नये. प्रदूषित पाणी वाहून जाण्यासाठी पाणीसाठा उपलब्ध नसल्याने, सर्व संबंधितांनी याची दक्षता घेण्याची गरज आहे. अन्यथा फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा देवकर यांनी दिला.