शिगाव : गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे व चांदोली धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा होणाऱ्या विसर्गामुळे शिगावला (ता.वाळवा) महापुराचा धोका वाढला आहे. सध्या नदीकाठची शेती, स्मशानभूमी, नाईकबा मंदिर पाण्याखाली असून, नदीकाठच्या घरामध्ये पाणी शिरले आहे. आष्टा-वडगावदरम्यान रस्त्यावर पाणी आले आहे.
टोप ते दिघंची रस्ता रुंदीकरणामध्ये शिगाव ते भादोले रस्त्याची उंची साधारण पाच फुटांनी वाढल्याने, शिगावच्या बाजूला पाणी झपाट्याने वाढले आहे. आष्टा- वडगाव मुख्य रस्त्यावरून पाणी वाहू लागल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत प्रशासन, महसूल प्रशासन, जलसंपदा विभागाने नागरिकांना स्थलांतराच्या सूचना दिल्या आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाने नदीकाठच्या कुटुंबांची जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, तसेच माध्यमिक विद्यालयामध्ये सोय केली आहे.
शिगाव-फारणेवाडी रस्ता वाहतुकीस पूर्ण बंद झाला आहे. फारणेवाडी-ढवळी- बागणीमार्गे सध्या वाहतूक सुरू आहे.
सरपंच उत्तम गावडे म्हणाले, पाण्याची पातळी झपाट्याने वाढत चालली आहे. तरी नदीकाठच्या नागरिकांनी लवकरात लवकर स्थलांतरित व्हावे. नदीवरील वीजपुरवठा बंद केल्यामुळे पिण्याचे पाणी येणार नाही. पाण्याचा वापर जपून करावा. पाणी उकळून व शुद्ध करून प्यावे.
फोटो : २३ शिगाव १
शिगाव (ता.वाळवा) येथे आष्टा वडगांव मुख्य रस्त्यावरून पाणी वाहत आहे.
फाेटाे : २३ शिगाव २
शिगावची स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे.