विकास शहा ।लोकमत न्यूज नेटवर्कशिराळा : पाडळी (ता. शिराळा) येथे प्रकाश पाटील व राहुल पाटील या बंधूंनी वडील मारुती हरी पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गावासाठी साडेपाच लाखांचे मोफत वॉटर एटीएम सुरू करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. या उपक्रमामुळे गावकऱ्यांना मोफत शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे.फटाकेमुक्त गाव, एक होळी एक पोळी असे विविध उपक्रम पाडळी गावात राबवले जातात. प्रकाश व राहुल यांच्या वडिलांचे गेल्यावर्र्षी निधन झाले. गावासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून लोकोपयोगी उपक्रम राबविण्याचा निर्णय पाटील कुटुंबीयांनी घेतला. त्यातून शुद्ध पाण्यासाठी मोफत वॉटर एटीएम सुरू करण्यात आले. या प्रकल्पाजवळ झाडेही लावण्यात आली आहेत. हा प्रकल्प शिराळा-वाकुर्डे या मुख्य रस्त्यालगत उभारण्यात आला आहे. त्यामुळे पाडळी गावाबरोबरच या मार्गावरील प्रवाशांनाही याचा उपयोग होणार आहे. याचा नुकताच लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी पी. आर. पाटील, अशोकराव पाटील, आकाराम पाटील, रमेश पाटील, बाबासाहेब पाटील, सरपंच सत्यवान पाटील, उपसरपंच महादेव पाटील, प्रकाश पाटील, राहुल पाटील उपस्थित होते.
पाडळीत वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त वॉटर एटीएम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2019 11:30 PM