शिराळा: खुजगाव (ता. शिराळा) येथील मेणी जलसेतुला मोठी गळती लागली असून पाणी पिकात साठून शेतीला तळ्याचे स्वरूप आले आहे. येथील लाखो लिटर पाणी उभ्या पिकाचे नुकसान करत थेट मेणी ओढ्यातून वाहुन जात आहे. चांदोली धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडले आहे. हेच पाणी खुजगाव येथील वारणा जलसेतूतून शाहुवाडी तालुक्यातील शेतीसाठी उजव्या कालव्यातून पुढे प्रवाहीत होते. पण हे पाणी शेतकर्यांच्या बांधावर पोहचेपर्यत दरम्यानच्या काळात लाखो लिटर पाणी वाया जाते.
जलसेतूचे जाॅईन्ट रबर निकामी होऊन पाण्यास गळती लागली असल्याचे पांटबंधारे विभागाचे अधिकारी सांगत आहेत. सध्या या धरणातून आर्वतन सुरू केले आहे, मात्र हे गळतीचे प्रमाण किंवा दुरुस्तीची कामे आर्वतन सुरू करण्यापूर्वीच केलेली आहेत.वारणा कालव्याची गळती कर्हाड-रत्नागिरी महामार्गावर खुजगांव हद्दीत होते आहे. काही वेळेला गळती होणारे पाणी रस्त्यावर ही पसरते. आता या महामार्गावरून कराड-रत्नागिरी वाहतूक सुरू आहे. मात्र या जल सेतूजवळ धोकादायक वळण असल्याने रस्ता रुंदीकरण केला आहे. त्यामुळे तेथे दुहेरी रस्ता झाला आहे. परंतु रस्त्यावर जलसेतूच्या गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी पडत आहे. त्याच्या निचर्यासाठी गटारी बांधल्या आहेत परंतु दुर्दैवाने ते पाणी गटारीतून प्रवाहित होत नसून पुन्हा रस्त्यावरच येत आहे.
ही गळती थांबवण्यासाठी दुरुस्ती केली आहे मात्र जॉईंट रबर बसवून गळती कमी केली आहे. मात्र पूर्णपणे जर जॉइंट बंद केले तर कालव्यास धोका होऊ शकतो. याचबरोबर सध्या आवर्तन सुरू आहे त्यामुळे हे आवर्तन बंद झाले की आम्ही दुरुस्ती करून ही गळती बंद करणार आहे. - एस ए मुजावर, कनिष्ठ अभियंता, वारणा पाटबंधारे विभाग कोकरूड