सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या राखेप्रश्नी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटिशीनंतर बुधवारी कारखान्याचे पाणी कनेक्शन पाटबंधारे विभागाने तोडले. दरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी लिंबाजी भड यांच्या पथकाने कारखान्याला भेट देऊन पाहणी केली. कारखान्याकडूनही प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना हाती घेतल्या जात असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. सांगली जिल्हा सुधार समितीने वसंतदादा कारखान्याच्या राखेप्रश्नी लढा उभा केला होता. सुधार समितीने प्रदूषण नियंत्रण मंडळाला नोटीस बजाविली होती. तसेच हरित न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी चालविली होती. त्याची चाहूल लागताच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वसंतदादा कारखाना २४ तासांत बंद करण्याची नोटीस काढली. ही नोटीस काल मंगळवारी बजाविण्यात आली. तसेच कारखान्याचे वीज व पाणी कनेक्शन तोडण्यासाठी वीज महावितरण व पाटबंधारे विभागाला सूचना केली होती. त्यानुसार बुधवारी पाटबंधारे विभागाने कारखान्याचे पाणी कनेक्शन तोडले. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी लिंबाजी भड, क्षेत्र अधिकारी बी. व्ही, मालवेकर, यु. जे. माने यांच्या पथकाने वसंतदादा कारखान्याला भेट देऊन प्रदूषणाची पाहणी केली. कारखान्याने आठ बॉयलरपैकी सहा बॉयलर सुरू ठेवले आहे. ज्या दोन बॉयलरमध्ये प्रदूषण नियंत्रण यंत्रणा नाही, ते बंद ठेवले आहेत. तीन बॉयलर जर्मनमेड असल्याने त्यातून प्रदूषण होत नाही. बॉयलर क्रमांक सात ते आठमधील यंत्रणा बंद होती. ती पुन्हा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे बॉयलरमधून बाहेर पडणाऱ्या राखेचे प्रमाण बऱ्यापैकी कमी झाले आहे. तसा अहवाल प्रदूषण अधिकाऱ्यांनी वरिष्ठ कार्यालयाला दिला आहे. या अहवालावरील निर्णयाची अधिकाऱ्यांना प्रतीक्षा आहे. त्यातच वसंतदादा कारखान्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे प्रतिज्ञापत्र सादर केले. यात ऊस गाळप हंगामात कारखाना बंद ठेवल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. कारखाना बंद ठेवणे हा त्यावरील उपाय नाही. प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्यासाठीची यंत्रसामग्री खरेदी केली जात आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत कारखान्यातून राख बाहेर पडणार नाही, अशी योजना करीत आहोत, असे म्हटले आहे. (प्रतिनिधी)वसंतदादा कारखान्याकडून प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक ती पावले उचलली आहेत. येत्या मार्चपर्यंत आम्ही सर्व यंत्रणा अद्ययावत करीत आहोत. कारखाना बंद पाडणे हा त्यावरचा पर्याय होऊ शकत नाही. कारखाना बंद झाल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. सध्या अनेक शेतकऱ्यांचा ऊस तुटून फडात पडला आहे. तो कारखान्यावर आणून गाळप करावा लागेल. आम्ही जिल्हा सुधार समितीच्या कार्यकर्त्यांशी प्रदूषणाबाबत चर्चा करणार आहोत. यातून निश्चितच चांगला मार्ग निघेल. - विशाल पाटील, अध्यक्ष, वसंतदादा कारखानाहरित न्यायालयात जाणार : अमित शिंदेवसंतदादा कारखाना २४ तासात बंद करण्याची नोटीस प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजाविली आहे. या नोटिशीत बॉयलरमध्ये राख प्रतिबंधक यंत्रणा नसल्याचे म्हटले आहे. बुधवारी अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर राखेचे प्रमाण कमी झाल्याचा अहवाल दिला आहे. यात प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका दुटप्पी आहे. गुरुवारी सकाळपर्यंत कारखाना बंद झाला नाही, तर जिल्हा सुधार समितीच्यावतीने हरित न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा समितीचे कार्याध्यक्ष अॅड. अमित शिंदे यांनी दिला.
वसंतदादा कारखान्याचे पाणी बंद
By admin | Published: February 11, 2016 12:15 AM