संतोष भिसे सांगली: कृष्णेच्या महापुराचा वेध घेण्यासाठी केंद्रीय जल आयोगाच्या ताफ्यात `कर्णास्त्र` दाखल झाले आहे. २०१९च्या प्रलयंकारी महापुराची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आयोगाने हे उपकरण उपलब्ध केले आहे. त्यामुळे पुराचा आदमास काही तास अगोदरच येणे शक्य झाले आहे.कृष्णा नदीपात्राचा अभ्यास करणाऱ्या जल आयोगाने अर्जुनवाड (ता. शिरोळ) केंद्रात उपकरण बसवले आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत सांगली, कोल्हापूर जिल्हे पूरप्रवण बनले आहेत. यावर्षीही चांदोली व कोयना धरणांत मुबलक पाणीसाठा आहे. उन्हाळी पाऊसही धो धो कोसळले आहेत. त्यामुळे पूरपट्टा पुन्हा हबकला आहे.केंद्रीय जल आयोगाची कोल्हापूर, सांगली, सातारा व बेळगांव जिह्यातील सर्व केंद्रे कृष्णा व कृष्णेस मिळणाऱ्या सर्व उपनद्यांच्या पाणीपातळीवर लक्ष ठेऊन आहेत. पुणे विभागाअंतर्गत सांगली, कोल्हापूर, सातारा जिह्यांमध्ये कराड, निपळी, वारंजी, तारगांव, नांद्रे, समडोळी, अर्जूनवाड, कुरुंदवाड, तेरवाड आणि सदलगा ही दहा उपकेंद्रे आहेत. पैकी महाबळेश्वरमध्ये यापूर्वीच स्वयंचलित यंत्र बसवले आहे. २०१९ मध्ये सांगली, कोल्हापूर जिल्हे महापुरात बुडाल्याने अर्जुनवाड (ता. शिरोळ) केंद्रावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.१९६९ मध्ये स्थापन झालेल्या अर्जुनवाड केंद्रावर स्वतंत्र प्रयोगशाळा आहे. पाण्याची पातळी, गती, उंची, खोली आदीचे मोजमाप तेथे होते. कर्मचाऱ्यांना रात्री-अपरात्री बोटींमधून नदीपात्रात उतरावे लागते. पाणी पातळी, खोली, रुंदी, हवेची आर्द्रता, गती, दिशा आणि तापमान यासह विसर्गाची माहिती घेतात. त्यांच्या मदतीला आता `कर्णास्त्र` हे अत्याधुनिक स्वयंचलित उपकरण मिळाले आहे.
मिरज-अर्जुनवाड पुलावर दररोज सकाळी त्याद्वारे माहिती संकलीत केली जाते. धरणातून विसर्ग होणाऱ्या पाण्याची गती पाहून संभाव्य पुराचा अंदाज घेतला जातो. कनिष्ठ अभियंता रुपेशकुमार यादव यांच्यासह आय. यु. मोमीन, उध्दव मगदूम, आर. डी. माने, राहूल डोंगरे, योगेश कोळी, गणेश डोंगरे हे जल अभ्यासक काम करीत आहेत.असे चालते कर्णचे कामप्रथम नदीपात्राची रुंदी तपासली जाते. कर्ण उपकरण पाण्यात सहा मीटरपर्यंत नेऊन खोली पाहिली जाते. अर्जुनवाड पुलावर प्रत्येक आठ मीटरवरील पॉईंटवरुन पाण्याचा ताशी वेग नोंदवला जातो. किती क्युसेक्स विसर्ग झाला? याची नोंद होते. ती पुढील केंद्राला कळवली जाते. पूरकाळात दररोज सकाळी दोन तासांच्या निरीक्षणातून संभाव्य महापुराचा अंदाज येतो.