वारणावती : जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या पाणीटंचाईची समस्या, पावसाची अनियमितता, दुष्काळजन्य परिस्थिती यामुळे पाणी हे जागतिक संकट बनले आहे. त्यामुळे पाणी संवर्धन करणे व त्याचा सुयोग्य वापर करणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे, असे प्रतिपादन व्याख्याते जितेंद्र लोकरे यांनी केले.
बेरडेवाडी (ता. शिराळा) येथे ग्रंथराज गाथा पारायण सोहळ्यात जागतिक जल दिनाचे औचित्य साधून ‘पाणी संवर्धन हेच समृद्ध गावाचे लक्षण’ या विषयावर व्याख्याते जितेंद्र लोकरे बोलत होते. ते म्हणाले, शिराळा तालुक्यातील अनेक गावे ही डोंगराळ व अतिदुर्गम भागातील आहेत. डोंगरावरील अनेक वाड्या-वस्त्यांना नदीचे पाणी मिळत नाही. फक्त पावसाचेच पाणी येथील गावांना मिळते. उन्हाळ्यात या वाड्या-वस्त्यांना प्रत्येकवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. शेतीला पुरेसे पाणी नसल्याने ग्रामस्थांचे मुंबईकडे स्थलांतर होत आहे. गावे ओस पडत आहेत. यावर प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी लोकसहभाग, पानी फौंडेशन व महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून पावसाचा प्रत्येक थेंब अडवून जलसाठे निर्माण करून त्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील राहुया.
यावेळी ज्ञानदेव बेरडे, आनंद कंदारे, रूपालीताई कंदारे, भीमराव सावंत, अनिल सावंत, महेश बेरडे, अशोक बेरडे, लक्ष्मण पाटील आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन बेरडेवाडी ग्रामस्थांनी केले.