शीतल पाटील ल्ल सांगलीजिल्ह्यात सुरू असलेला बेसुमार पाणी उपसा, पावसाचे कमी झालेले प्रमाण, जलसाक्षरतेबाबत उदासीनता, पाणी संवर्धनाबाबतची अनास्था अशा अनेक कारणांमुळे जिल्ह्यातील भूजल पाणी पातळी वेगाने घटत आहे. यंदा दुष्काळी कवठेमहांकाळ, आटपाडी, जत या तालुक्यांसह सधन असणाऱ्या मिरज, पलूस, वाळवा या तालुक्यातील भूजल पातळीत घट झाल्याची धक्कादायक बाब भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. ही निश्चित चिंतेची बाब असून, वेळीच उपाययोजना न केल्यास जिल्ह्याला पुन्हा दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्याची वेळ येईल. जिल्ह्यात वर्षाला सरासरी ५१० मिलिमीटर पावसाची नोंद होते. गतवर्षीही जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यात भूजल पातळीत गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत अर्धा ते दीड मिलिमीटरची वाढ झाली होती. या काळातही पलूस व तासगाव या दोन तालुक्यातील भूजल पातळीत मात्र घट झाल्याचे दिसून येते. पलूस तालुक्यात पाच वर्षांच्या तुलनेत उणे १९, तर तासगावमध्ये उणे ७६ मीटर पाणीपातळी घटली. पावसानंतर भूजल सर्वेक्षण विभागाने घेतलेली ही आकडेवारी चिंताजनक होती. भूजल सर्वेक्षणकडून जिल्ह्यातील ८४ निरीक्षण विहिरींचा अभ्यास करून भूजल पातळीचा आलेख तयार केला आहे. वर्षातून आॅक्टोबर, जानेवारी, मार्च व मे या चार महिन्यांत या विभागाकडून भूजल पातळी घेतली जाते. या अहवालावरच टंचाईग्रस्त गावांची निश्चिती केली जाते. आॅक्टोबर महिन्यात केलेल्या सर्वेक्षणात सरासरी पाणीपातळीत वाढ दिसत असली, तरी तासगाव, कवठेमहांकाळ व जत तालुक्यातील काही गावातील पाणीपातळीत सर्वाधिक घट झाली आहे. आॅक्टोबर महिन्यापेक्षा जानेवारी महिन्यातील आकडेवारी पाहता पाणीपातळीची स्थिती खालावल्याचे दिसून येते. जानेवारीत आटपाडी तालुक्यात ०.१४, जतला १.०२, कवठेमहांकाळला २.०८, कडेगावमध्ये १.८३, खानापुरात १.२५, मिरज ०.८७, पलूस ०. ६६, शिराळा ०. ७३, तासगाव ०. ६३ आणि वाळवा तालुक्यात ०.९८ मीटरने पाणीपातळीत घट झाली आहे. पावसाने अथवा पाणी स्रोतांच्या माध्यमातून मुरलेल्या पाण्यापेक्षा जादा पाण्याचा वापर झाल्यानेच तालुक्यातील पाणी पातळीत घट नोंदविली आहे. वाळवा तालुक्यातील उसाचे क्षेत्र आणि त्यासाठीच्या पाणी वापरामुळेही तालुक्यावर ही परिस्थिती ओढविल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. जानेवारीच्या सरासरी पाणीपातळीत आटपाडी तालुक्याच्या सरासरीत कमी घट झाली असली तरी, खरसुंडी, उंबरगाव, पांढरेवाडी या परिसरात ४ ते ५ मीटरपेक्षा जास्त पाणीपातळीत घट झाली आहे. जत तालुक्यातील बागेवाडी, जाडरबोबलाद, उटगी या परिसरातही २ ते ४ मीटरने घट झाली आहे. सर्वाधिक घट कवठेमहांकाळ तालुक्यात नोंदविली गेली असून, ती दोन मीटरपेक्षा जास्त आहे. जिल्ह्यात अतिशोषित भागाचा जादा समावेश आहे. पाच वर्षांतील मूल्यांकनावरून कवठेमहांकाळ, तासगाव, मिरज आणि जत तालुक्यातील २० गावे अतिशोषित आहेत. पाण्याची उपलब्धता लक्षात न घेताच बेसुमार उपसा केल्यानेच भूजल पातळी चिंताजनक बनली आहे. काय कराव्यात उपाय योजना...दरवर्षी शासनाकडून जलयुक्त शिवार, राष्ट्रीय पेयजल योजनेतून पुनर्भरणाची कामे होतात; पण जनतेचा सहभाग वाढला नसल्याने अद्याप अपेक्षित परिणाम समोर आलेले नाहीत. शासनाने भूजल अधिनियम २००९ कायदा केला आहे. त्यातून ६० मीटरपेक्षा अधिक खोलीवर कूपनलिका खोदता येत नाहीत. बोअरवेलच्या गाड्यांची नोंदणी सक्तीची आहे; पण लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे या कायद्याची अंमलबजावणीही होताना दिसत नाही. विहिरींचे पुनर्भरण करणे, पावसाचे पाणी अडविणे, शोषखड्डे तयार करणे अशाप्रकारे पाण्याच्या थेंबा-थेंबाचे नियोजन करणे आवश्यक आहे, तरच भूगर्भाची पातळी वाढेल. अन्यथा भविष्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल.
पाण्याचे संकट, होत चालले बिकट..!
By admin | Published: March 21, 2017 11:40 PM