माधवनगर : गावाला गेल्या ३४ दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसल्याच्या निषेधार्थ आज सकाळी सांगली जिल्हा सुधार समितीच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी माधवनगर ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला. यावेळी आठ दिवसात ग्रामपंचायतीवर फौजदारी दाखल करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याबाबतचे निवेदनही कार्यालयावर चिकटवले. गेल्या काही महिन्यांपासून माधवनगर गावाला पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. ग्रामस्थ ग्रामपंचायतीचा कर भरत असूनही नागरी सुविधा व पाणी पुरवठा होत नसल्याने आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी मंगळवारी जिल्हा सुधार समितीचे कार्याध्यक्ष अॅड अमित शिंदे, रवींद्र चव्हाण, अंकुश केरीपाळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. गांधी चौकातून मोर्चास सुरुवात झाली. ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा आल्यावर मुख्य गेटजवळ तो अडवण्यात आला. याठिकाणी प्रमुख कार्यकर्त्यांची भाषणे झाली. यावेळी अॅड़ अमित शिंदे म्हणाले की, गावाला नागरी सुविधा देण्यात व आपले कर्तव्य बजावण्यात कसूर केल्याबद्दल ग्रामविकास अधिकाऱ्यांवर समितीच्यावतीने फौजदारी दाखल करणार आहे. रवींद्र चव्हाण, अंकुश केरीपाळे, राजाराम यमगर यांचीही भाषणे झाली. आंदोलनकर्त्यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांनी खाली येऊन निवेदन घ्यावे, अशी मागणी केली, पण ग्रामविकास अधिकारी उपस्थित नसल्याने सरपंच नंदाताई कदम यांनी मोर्चासमोर येऊन निवेदन स्वीकारण्याची तयारी दर्शविली. पण अॅड़ शिंदे यांनी त्यास नकार दिला. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर लवकर कारवाई होणार असल्याने कोणत्याही लोकप्रतिनिधीला निवेदन देणार नसल्याचे सांगत, ग्रामविकास अधिकारी न आल्यास ग्रामपंचायत कार्यालयाच्या दरवाजावर निवेदन चिकटवणार असल्याचे सांगितले. ग्रामविकास अधिकारी आंदोलनाकडे फिरकले नाहीत. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर निवेदन चिकटवले. यावेळी दत्ता पाटील, डॉ. ज्ञानेश्वर शिंदे, आनंद शिंदे, यशवंत हिरकुडे, प्रवीण शिंदे, बाळासाहेब काळे, रघुनाथ पाटील, युवराज पवार, किरण पवार, विजय सोडगे, सुनीता धायगुडे, सुरेखा तिमगोळ, शालन कदम, यशवंत हिरकुडे, संजय पाटील, सुदेश जमदाडे उपस्थित होते. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चानंतर आंदोलकांनी जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील यांची भेट घेतली. यावेळी गटविकास अधिकारी, मिरज यांना माधवनगरमधील पाणीप्रश्न दोन दिवसात सोडवण्याचे आदेश देत ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले. (वार्ताहर)मोठा बंदोबस्त : आंदोलनाची चर्चागांधी चौकात मोर्चा सुरू झाल्यावर ग्रामस्थांची उपस्थिती अल्प होती. पण ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा आल्यावर विविध पक्षाचे कार्यकर्तेही त्यामध्ये सहभागी झाले होते. पाणी प्रश्नावर ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याची काहींनी तयारी सुरू केली होती. पण सुधार समितीचे अॅड़ अमित शिंदे यानी हा इशारा मोर्चा असून, यापुढेही मोठे आंदोलन होणार असल्याचे सांगितल्याने हा प्रयत्न बारगळला. बऱ्याच दिवसांनी मोठ्या पोलिस बंदोबस्तात मोर्चा निघाल्याने व कायदेशीर तरतुदींचा वापर करत भाषणे झाल्याने आंदोलनाची गावात जोरदार चर्चा होती.ग्रामपंचायतीविरोधात जोरदार घोषणाबाजीमोर्चात आलेल्या आंदोलकांमध्ये महिला मोठ्या प्रमाणात होत्या. पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने व पदाधिकारी उध्दट उत्तरे देत असल्याने आक्रमक महिलांनी सरपंच व ग्रामसदस्यांसमोर तीव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी ग्रामपंचायतीविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. यावेळी मोजके ग्रामपंचायत सदस्य सरपंचांसमवेत कार्यालयात उपस्थित होते.
माधवनगरमधील पाणीप्रश्नावर आंदोलन
By admin | Published: April 05, 2016 11:41 PM