सांगली : वारणा (चांदोली) धरणातून थेट सांगलीला पाइपलाइनद्वारे पाणी आणणे किती योग्य आहे, याचे सर्वेक्षण करण्यासाठी स्वतंत्र कंपनीची नियुक्ती करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला, तसेच वारणा उद्भव योजना राबवायची का? या प्रश्नावर चर्चा झाली. या सर्वेक्षणानंतरच सांगली, कुपवाड शहराला थेट धरणातूनपाणी मिळणार की नाही, हे निश्चित होणार आहे.
कृष्णा नदीचे दूषित पाणी आणि वारणा धरणातून पाणी आणण्याच्या नियोजनासाठी सांगलीतील महापालिकेच्या कार्यालयात शुक्रवारी बैठक झाली. यावेळी आयुक्त सुनील पवार, उपायुक्त वैभव साबळे, उपायुक्त पंडित पाटील, जलसंपदाच्या कोल्हापूर विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक नवनाथ अवताडे, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे विशेष कार्यअधिकारी सुनील पाटील, कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे, जलसंपदा विभागाचे निवृत्त अधिकारी विजयकुमार दिवाण, प्रभाकर केंगार, जीवन प्राधिकरणचे अधिकारी एस.के. रांजणे, उपअभियंता राजाराम गळंगे यांनी चर्चेत सहभाग घेतला.थेट वारणा धरणातून पाणी उपलब्धतेचा प्रश्न उद्भवणार नाही, असे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वारणा नदीत मृत झालेल्या माशाप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वारणा योजना ११० किलोमीटर लांबीची असणार असून, देखभाल करणे ही बाबही अवघड असेल. सध्या माळबंगला येथील ७० एमएलडीचा जलशुद्धीकरण प्रकल्प अतिशय चांगला आहे. गेल्या दहा वर्षांत कॉलरा, काविळीची साथही आलेली नाही. वारणा उद्भव योजनेचा प्रस्ताव केला जात आहे. कृष्णा नदीचे पाणीही जास्तीत जास्त चांगले, शुद्ध, जास्त दाबाने पाणीपुरवठा करणे याबाबींवर भर देता येईल, असा सूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत व्यक्त केला.
आयुक्त पवार म्हणाले, थेट वारणा धरणातून पाणी आणणे, वारणा उद्भव योजना राबविणे यासंदर्भात येणारा खर्च व शासनाकडून उपलब्ध होऊ शकणारा निधी याबाबत सर्वंकष अभ्यास करणे, नदीतील प्रदूषण यासंदर्भातही अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागार कंपनी नियुक्त केली जाणार आहे. धरणातून पाणी आणायचे की, वारणा उद्भव योजना राबवायची; अथवा कृष्णा नदीचेच प्रदूषण कमी करणे, अत्याधुनिक यंत्रणा वापरून पाणी अधिकाधिक शुद्ध करून ते सांगली, कुपवाडला पुरवठा करणे यासंदर्भात तज्ज्ञ सल्लागार समितीचा अहवाल आल्यानंतर निर्णय घेतला जाईल.
नैसर्गिक उताराने पाणी येईलकेंगार, रांजणे यांनी शुद्ध पाण्यासाठी वारणा धरण हाच एकमेव स्रोत असल्याकडे लक्ष वेधले. महापालिकेने हाच प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, अशी आग्रही मागणी केली. नैसर्गिक उताराने हे पाणी सांगलीपर्यंत येऊ शकते. महापालिकेच्या भविष्यातील दहा लाख लोकसंख्येसाठी दोन टीएमसी पाणी पुरेसे आहे.
योजनेसाठी १८५० कोटी
सांगली, कुपवाडसाठी थेट वारणा धरणातून पाणी आणायचे झाल्यास १२०० कोटी रुपयांचा निधी लागेल. मिरज शहराचा समावेश करायचा झाल्यास आणखी २५० कोटी रुपये लागतील. महापालिकेचा हिस्सा ४०० कोटींवर जाईल, असे आर्थिक गणित महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मांडले.