सांगली : कोयना धरणातून सोडलेले पाणी अखेर रविवारी सांगलीत पोहोचले. त्यामुळे सांगली, कुपवाडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. किमान आठवडाभर पुरेल इतका पाणीसाठी नदीपात्रात असल्याने पिण्याची पाण्याची चिंता मिटली. तरीही महापालिकेने पाणी कपातीचे धोरण कायम ठेवले आहे.गेल्या आठ दिवसांपासून कृष्णा नदीतील पाणीसाठा कमी झाला होता. पावसाने ओढ दिल्याने धरणातून पाणी सोडण्यात आले नव्हते. जलसंपदा विभागाने शेती व औद्योगिक वसाहतींना पाणी उपसा बंदी लागू केली.
कोयना धरणातून १०५० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. पण हे पाणी सांगलीपर्यंत न पोहोचल्याने चिंता वाढली होती. महापालिकेने पाणी कपातीला सुरूवात केली होती. दोनदा पाणी देणाऱ्या भागात सध्या दिवसातून एकाच पाणी दिले जात आहे. कुपवाड औद्योगिक महामंडळाला पाणी उपसा लागू केल्याने वारणाली, विजयनगर परिसरातील अनेक गल्ल्यामध्ये पाणी टंचाई जाणवत होती. त्यासाठी महापालिकेने टँकर सुरू केले होते.
कोयनेतून सोडलेले पाणी रविवारी सांगलीत पोहोचले. सध्या नदीपात्रात दोन ते तीन फुट पाण्याचा साठा आहे. हा साठा किमान आठवडाभर पुरेल इतका आहे. त्यामुळे सध्या तरी सांगली, कुपवाडकरांची चिंता मिटली आहे. पावसाने आणखी ओढ दिली तर मात्र पाणी टंचाईचे सावट कायम राहणार आहे.हरिपूर ते म्हैसाळ उपसा बंदी उठविली
हरिपूर ते म्हैसाळ बंधारा हद्दीपर्यंत सुरु असणारी उपसा बंदी उठविण्यात आली असून या योजनांचा विद्युत प्रवाह पूर्ववत करण्याच्या सुचना संबधित यंत्रणेला देण्यात आली असल्याची माहिती सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी दिली. सांगली ते टेंभूपर्यंतची कृष्णा नदी काठावरील उपसाबंदी मात्र कायम आहे.