फोटो ओळ : संख (ता. जत) येथील मध्यम प्रकल्पाचे उजवा कालवातून पाणीगळती सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
संख : जलसंपदा व पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षाने संख (ता. जत) येथील मध्यम प्रकल्पातील उजवा कालव्याचा जॅकवेल नादुरुस्त झाल्याने पाणीगळती सुरू आहे. कालवातून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे प्रकल्पातील पाणीसाठा कमी होत असून, गळती बंद करण्याची मागणी शेतकऱ्यांंतून होत आहे.
जत तालुक्याच्या पूर्व भागातील संख मध्यम प्रकल्प जिल्ह्यात साठवण क्षमतेने दुसऱ्या क्रमांकाचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प १९९५ मध्ये पूर्ण झाला आहे. साठवण क्षमता ७०३ दघलफू आहे. ओलिताखाली येणारे क्षेत्र तीन हजार २०० हेक्टर असून, साडेआठरा एकर जमिनीवर तलाव व्यापलेला आहे. मध्यम प्रकल्प बांधून झाल्यावर त्याचवर्षी प्रथमच एका रात्रीत पूर्णपणे भरला होता. त्यानंतर २००३, २००९ ला भरला होता. यावर्षी ११ वर्षांनंतर अतिवृष्टीने तलाव तुडुंब भरला आहे.
मध्यम प्रकल्पातून डावा व उजवा कालव्यात पाणी आले आहे. त्यामध्ये उजवा कालवा १: ७ कि.मी व डावा कालवा ३२ कि.मी आहे. उजवा कालवा भिवर्गी ओढापर्यंत तर डावा कालवा उमदीपर्यंत आहे.
पाटबंधारे विभागाकडे वॉचमन नसल्यामुळे अज्ञाताने उजव्या कालव्याचे मेन गेटच्या व्हील रॉड मधोमध कापून चोरून नेला आहे. त्यामुळे उजव्या कालव्याला गळती सुरू आहे. याच्या दुरुस्तीसाठी पाटबंधारे विभागाकडे मागणी केली होती. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
पाण्याचा अपव्यय
कालवा गळतीतून भिवर्गी ओढा पात्रात लाखो लिटर पाणी वाहून जात आहे. जॅकवेलची दुरुस्ती करून पाण्याचा अपव्यय टाळावा, अशी मागणी होत आहे.
कोट
जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना गळतीसंदर्भात निवेदन दिले आहे. यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही, तरी संबंधित अधिकारी व मंत्री यांनी लक्ष घालून ती बंद करावी, अशी मागणी आहे.
- मल्लिकार्जुन फुटाणे,
शेतकरी,
माजी चेअरमन विकास सोसायटी, संख
कोट
उजवा कालवाची पाणीगळती माती टाकून तीन वेळा दुरुस्ती केली आहे. रात्रीच्या वेळी गेटचे व्हील रॉड वाकवितात. वॉचमन नसल्याने नियंत्रण ठेवता येत नाही.
- संजय मोरे,
शाखाधिकारी,
पाटबंधारे विभाग, संख