वारणावती : चांदोली धरण व परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून पाणलोट क्षेत्रातून धरणात १० हजार १२१ क्युसेक प्रति सेकंद वेगाने पाण्याची आवक होत आहे. गेल्या २४ तासात धरणाची पाणी पातळी सव्वा मीटरने वाढली आहे, तर वारणावती येथील पर्जन्यमापक केंद्रावर ६९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरण परिसरात यावर्षी चौथ्या वेळेस अतिवृष्टी होत आहे.
शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागात चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रास मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने वाढत आहे. गेल्या २४ तासात ६९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाण्याची आवक वाढल्याने पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. धरणाची पाणी पातळी सध्या ६०८.२५ मीटर झाली असून, पाणीसाठा ५३२.२२ दशलक्ष घनमीटर म्हणजे १८.४८ टीएमसी झाला आहे. त्याची टक्केवारी ५३.७० आहे.
मुसळधार पावसामुळे शेतकरी वर्गाची तारांबळ उडत आहे. एकीकडे खरीप भात रोप लावणीची लगबग सुरू आहे, तर दुसरीकडे धूळवाफेच्या भाताची उगवण चांगली झाली असल्याने भांगलणीची कामे सुरू आहेत. उभ्या पावसात महिला भात भांगलणी करताना दिसत आहेत. डोंगर-दऱ्यातून धबधबे कोसळू लागल्याने हिरवागार निसर्ग पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करीत आहेत. हवेत कमालीचा गारठा निर्माण झाला आहे.फोटो : ०६ वारणावती १चांदोली धरण पाणीसाठा