सांगली : टेंभू, ताकारी उपसा सिंचन योजनांतून दुष्काळी भागाला पाणी उपसा होत आहे. यामुळे कृष्णा नदीतीलपाणी पातळी घटली आहे. नदीत पुरेसा पाणीसाठा नसल्यामुळे वाळवा, मिरज आणि पलूस तालुक्यातील उपसा सिंचन योजना ठप्प झाल्या आहेत. यामुळे कृष्णा नदीत कोयना धरणातून जादा पाणी सोडावे, अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी केली आहे.गेल्या १० ते १५ दिवसांपासून भिलवडी ते हरिपूरपर्यंत कृष्णा नदीची पाण्याची पातळी अतिशय कमी झाली आहे. यामुळे नदीकाठच्या शेतीचे उपसा सिंचन येाजनांचे पंप बंद ठेवावे लागत आहेत. परिणामी तीव्र उन्हामुळे पिके वाळू लागली आहेत. पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर पाणी सोडण्यात येत असल्याचे जुजबी उत्तर मिळत आहे. कोयनेमधून दोन हजार ७०० क्युसेकने पाणी सोडले जात आहे.परंतु, सध्या टेंभू व ताकारी योजनेचे २० पंप चालू असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा उपसा होत आहे. त्यामुळे भिलवडी ते हरिपूरपर्यंत फार कमी प्रमाणात पाणी येत आहे. यामुळे कृष्णा नदीत पाणीसाठा कमी आहे. यामुळे कोयना धरणातून जादा पाणी सोडण्याची मागणी सुनील फराटे यांनी केली आहे.
जलसंपदा कार्यालयासमोर आंदोलन करु : सुनील फराटेजलसंपदा विभागामधील अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे कृष्णा नदीकाठच्या गावांमध्ये शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे. अधिकाऱ्यांनी कोणतेही कारण न सांगता कोयनेतून जादा ५०० क्युसेकने पाणी सोडण्याची मागणी केली आहे. अधिकाऱ्यांनी तत्काळ पाणी न सोडल्यास शेतकरी सांगलीतील वारणाली येथील कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत, असा इशाराही सुनील फराटे यांनी सोमवारी दिला आहे.