मिरज : मिरजेत पुराचे पाणी ६२ फुटांपर्यंत पोहोचल्याने कृष्णा घाट व परिसरातील बाराशे कुटुंबातील साडेचार हजार जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे. मिरज-शिरोळ रस्ता बंद झाला असून मिरजेतील कृष्णा नदी पुलावरून पाणी वाहत आहे. मिरजेत कृष्णा घाटावर पाणी पातळी ६२ फुटावर पोहोचल्याने परिसरातील शेतात पाणी पसरले आहे.
कृष्णा घाट रस्त्यावर ६ फुटापर्यंत पाणी आहे. कृष्णा घाटावर महापालिकेतर्फे नागरिकांना निवारा केंद्रात हलविण्यात येत आहे. कृष्णाघाट व या रस्त्यावरील सुमारे साडेचार हजार जणांचे स्थलांतर करण्यात आल्याचे महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांनी सांगितले. कृष्णा घाटावरील ४०० कुटुंबातील १,७०० जणांना, कृष्णाघाट रस्त्यावरील ६०० कुटुंबातील २,२०० जणांना, राजीव गांधीनगर येथील १२० कुटुंबातील ६०० जणांना बेथेस्दा शाळा व मिरज हायस्कूल निवारा केंद्रात आश्रय देण्यात आला आहे.
कृष्णाघाटावरील २३० जनावरांना मिरज मार्केट यार्डात नेऊन त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था केली आहे. मिरज शहरात चांद कॉलनीपर्यंत पाणी आले आहे. मिरज शहरात प्रभाग सातमध्ये प्रताप कॉलनी परिसरात पुन्हा नागरिकांच्या घरात ड्रेनेजचे पाणी शिरले. गेल्या अनेक वर्षे या परिसरात पावसाळ्यात ड्रेनेजचे पाणी नागरिकांच्या घरात शिरते. जोरदार पावसामुळे ड्रेनेजचे पाणी नागरिकांच्या घरांत शिरल्याने प्रापंचिक साहित्यांचे नुकसान झाले. नादुरुस्त ड्रेनेज यंत्रणेमुळे नागरिक महापालिकेच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे.