मिरज : पावसाची संततधार व धरणातून पाण्याचा विसर्ग यामुळे मिरजेत कृष्णा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. गुरुवारी दिवसभरात मिरज कृष्णा नदीच्या पाणीपातळी नऊ फुटांनी वाढून ३९ फुटांवर पोहोचली. कृष्णा घाटावर धोका पातळी ५१ फूट असून, पाणीपातळी आणखी वाढल्यास नदीकाठावर महापालिका स्मशानभूमीत पाणी शिरण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. कोयना व वारणा धरणांतून विसर्ग सुरू झाल्यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीतही वाढ होत आहे. मिरज कृष्णा घाटावर कृष्णानदीची पाणीपातळी गुरुवारी ३० फुटांवर होती. मात्र, गुरुवारी रात्री त्यामध्ये नऊ फुटांनी वाढ होऊन पाणीपातळी ३९ फुटांवर पोहोचली.
मिरज कृष्णा नदीची पाणीपातळी ४५ फुटांपर्यंत वाढल्यास नदीचे पाणी पात्राबाहेर स्मशानभूमीत शिरते. त्यामुळे पाणी वाढत राहिल्यास स्मशानभूमीत पाणी शिरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पाणीपातळीत वाढ होत असल्याने पूरपट्ट्यात राहणारे नागरिक धास्तावले आहेत.