सांगली : शेतकरी पाण्यासाठी आक्रोश करीत होते, तेव्हा राज्य सरकारला पाणी योजना सुरू करण्याची इच्छा झाली नाही. निवडणुका जाहीर होताच त्यांनी योजना सुरू केल्या. २१ फेब्रुवारीनंतर त्या बंदही होतील. भाजप पाण्याचा उपयोग केवळ मतांसाठीच करीत आहे, अशी टीका राष्ट्रवादी नेते आ. जयंत पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केली. ते म्हणाले की, पाणी योजना सुरू करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी आक्रोश करीत होते. त्यावेळी थकीत बिलाचे कारण सांगून योजना सुरू होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यावेळी सरकारला लोकांची कणव आली नाही. आता निवडणुकांमुळे मतांवर डोळा ठेवून योजना सुरू केल्या आहेत. लोक या सर्व गोष्टी जाणून आहेत. निवडणुका संपल्यावर पुन्हा योजनांचे पाणी बंद होणार असल्याने लोक भाजपच्या या खेळीला भुलणार नाहीत. निवडणुकांच्या तोंडावर अर्थसंकल्प जाहीर केला जाऊ नये, असे वाटत असले तरी, आता याबाबत न्यायालयाचा निर्णय झालेला आहे. न्यायालयीन निर्णयाचा आम्ही आदर करतो. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मोठमोठ्या घोषणा केल्या जाणार, याची कल्पना आम्हाला आहे. आजवर भाजपने याच गोष्टींचे भांडवल केले आहे. घोषणांची अंमलबजावणी होत नसल्याची बाब आता लोकांच्याही लक्षात आलेली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांबद्दल ते म्हणाले की, तालुकास्तरावरील पदाधिकारी व नेत्यांना आम्ही काहीप्रमाणात निर्णय घेण्याचे व चर्चा करण्याचे अधिकार दिलेले आहेत. आघाडी करायची की नाही, कोणाबरोबर करायची, याबाबतचे निर्णय तालुकास्तरावरच घेतले जातील. जिल्हास्तरावर अंतिम चर्चा होणार असली तरी, तालुक्यातील नेत्यांचा निर्णय महत्त्वाचा असेल. राष्ट्रवादीतील लोक भाजपमध्ये येत असल्याबद्दलचा गाजावाजा काही नेतेमंडळी करीत आहेत. त्यात कोणतेही तथ्य नाही. राष्ट्रवादीच्या मुलाखतींच्या कार्यक्रमाला झालेली गर्दीच सर्व काही स्पष्ट करीत आहे. जातीयवादी पक्षांना रोखण्यासाठी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी व्हावी, अशी माझी इच्छा होती. अजूनही काही ठिकाणी चर्चा सुरू आहे. (प्रतिनिधी)
भाजपकडून पाण्याचे राजकारण
By admin | Published: January 24, 2017 12:53 AM