सांगली : अमेरिकन तंत्रज्ञानाचा डंका पिटत महापालिकेने ७० दशलक्ष लिटर (एमएलडी) क्षमतेचे अत्याधुनिक जलशुद्धीकरण केंद्र उभारले; पण नुकत्याच झालेल्या पावसाने नदीपात्रात मातीमिश्रित व गढूळ पाणी आल्याने या शुद्धीकरण यंत्रणेवर ताण आला. त्यामुळे दररोजच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. गेल्या दोन दिवसापासून शहरातील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा झाला, तर काही भागात पाणीच आले नाही.
महापालिकेच्या माळबंगला येथे ७० एमएलडी व ५६ एमएलडी क्षमतेची दोन जलशुद्धीकरण केंद्रे आहेत. तत्पूर्वी हिराबाग वाॅटर वर्क्स येथील २८ एमएलडी व माळबंगला येथील ३६ एमएलडी जलशुद्धीकरण केंद्रातून शहराला पाणीपुरवठा केला जात होता. कृष्णा नदीत मिसळणारे शेरीनाल्याचे दूषित पाणी, उन्हाळ्यात नदीपात्र कोरडे पडत असल्याने २००६ साली वारणा पाणी योजनेला मंजुरी देण्यात आली. पण प्रत्यक्षात या योजनेतून सांगली, कुपवाड परिसरात पाण्याच्या टाक्या, जलवाहिन्यांची कामे झाली तसेच ७० एमएलडीचे नवीन जलशुद्धीकरण केंद्रही उभारण्यात आले. पूर्वीच्या ३६ एमएलडीच्या केंद्राची क्षमताही ५६ एमएलडीपर्यंत वाढविण्यात आली. नवीन जलशुद्धीकरण केंद्रात अमेरिकन स्काडा तंत्रज्ञानाचा वापर केल्याचा दावा करण्यात आला. सांगलीकरांना शुद्ध पाणी मिळेल, असेही सांगण्यात आले. पण दोन वर्षानंतर या दाव्यातील फोलपणा समोर येऊ लागला आहे.
गेल्या आठवड्यात जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. नदीपात्रात मातीमिश्रित व गढूळ पाणी आले. या पाण्याचा उपसा करून त्यावर प्रक्रिया करण्यात महापालिकेच्या यंत्रणेला अडचण आली. जलशुद्धीकरण केंद्रातील वाळूच्या बेडवर ताण आला. दररोज ८४ एमएलडी पाणी शुद्ध केले जात होते. पण जलशुद्धीकरण यंत्रणा कोलमडल्याने त्यात २० एमएलडीपर्यंत घट झाली. परिणामी शहरातील नागरिकांना गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अपुरा पाणीपुरवठा होत आहे. काही भागात पाणीच गेले नाही, तर काही भागात अपुरा पुरवठा झाला. आता नदीपात्रातील मातीमिश्रित पाणी कमी झाल्याने जलशुद्धीकरण यंत्रणा पूर्ववत केल्याचे महापालिकेचे अधिकारी सांगत असले तरी बुधवारी अनेक भागाला पिण्याचे पाणी मिळू शकलेले नाही.
चौकट
जलशुद्धीकरण केंद्र
७० एमएलडी
५६ एमएलडी
------
दररोजचा पुरवठा : ८४ एमएलडी
सध्याचा पुरवठा : ६० ते ६५ एमएलडी
----------
पाण्याच्या टाक्या : २७
एकूण लोकसंख्या : ३.५ लाख