सांगली : महापालिकेच्या उपसा पंप व जलशुद्धीकरण केंद्राचा विद्युत पुरवठा सोमवारी दुपारी खंडित झाल्याने सोमवारी सांगली व कुपवाड परिसरातील काही भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला. मंगळवारीही शेरीनाला योजनेच्या कामामुळे दिवसभर विद्युत पुरवठा खंडित राहणार असल्याने, शहराच्या बहुतांश भागात पाणीपुरवठा होऊ शकणार नाही.
सांगलीत सोमवारी रंगपंचमीच्या सणालाच पाणीटंचाई निर्माण झाली. शिवोदयनगर, लक्ष्मीनगर, अजिंक्यनगर, संजयनगर, साठेनगर, चैतन्यनगर, दडगे प्लॉट, जगदाळे प्लॉट, पाटणे प्लॉट, रेळेकर प्लॉट, अभिनंदन कॉलनी, राम रहिम कॉलनी, साईनगर, शिंदे मळा, टिळकनगर, हुडको कॉलनी आदी भागात सोमवारी दिवसभर पाणीपुरवठा होऊ शकला नाही. दुपारी साडेतीन वाजता पाणीपुरवठा यंत्रणेचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने माळबंगल्यावरील पाण्याच्या टाक्या भरू शकल्या नाहीत. त्यामुळे रात्री अनेक भागातील पाणीपुरवठा बंद झाला.
मंगळवारीसुद्धा शहराच्या बहुतांश भागासह कुपवाड परिसरातही अपुरा पाणीपुरवठा होणार आहे. काही ठिकाणी दिवसभर पाणीपुरवठाच करणे शक्य होणार नसल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सांगलीत गेल्या काही दिवसांपासून वारंवार पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. कधी नदीपात्रातील पाणी पातळीत घट झाल्याने, तर कधी विद्युत पुरवठा खंडित झाल्याने गोंधळ निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. गत आठवड्यात शहराच्या बहुतांश भागात टँकरने पाणीपुरवठा करावा लागला.सोमवारी पुन्हा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. माळबंगल्यावरील टाक्यांमध्ये पाणी भरता आले नाही. रात्री उशिरापर्यंत टँकरही याठिकाणी पाण्याची प्रतीक्षा करीत थांबले होते.नागरिकांच्या तक्रारी वाढत असल्याने मंगळवारी काही भागात महापालिकेस टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे.
अशा परिस्थितीत पुन्हा पाण्यासाठी नागरिकांना धावाधाव करावी लागणार आहे. अचानक उद्भवलेल्या या विद्युत समस्येमुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांची धावाधाव सुरू आहे. पर्यायी व्यवस्था करताना त्यांची दमछाक होत आहे.
महावितरणला : पत्रमंगळवारी शेरीनाला योजनेच्या कामासाठी दिवसभर विद्युत पुरवठा खंडितचे नियोजन होते. ते रद्द करण्याची विनंती महापालिकेने कंपनीला केली आहे. महावितरणने रात्री उशिरा ही विनंती मान्य केल्याने काहीअंशी पाणीटंचाईची समस्या दूर झाली आहे.
पाण्याची काटकसर : करण्याचे आवाहनसांगली, कुपवाड परिसरात मंगळवारी अपुरा पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी मंगळवारी पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे. विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते.