अशोक पाटील
इस्लामपूर : राष्ट्रवादीच्या विरोधातील विकास आघाडीचा सत्ता कालावधी संपल्यानंतर मंगळवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी इस्लामपूर नगरपालिकेत ‘एन्ट्री’ केली. रांगोळी काढून त्यांचे स्वागत झाले. इस्लामपूरची बारामती करण्याचे पाटील यांचे स्वप्न अधुरे आहे. ते पूर्ण करण्यासाठी त्यांची पावले कशी पडणार, याबाबत शहरवासीयांमध्ये उत्सुकता आहे.
शहरात सध्या खराब रस्ते, तुंबलेल्या गटारी, बंद पडलेल्या बागा, आंतरराष्ट्रीय जलतरण तलावाचा बोजवारा, गुंठेवारी, बेकायदेशीर अतिक्रमणे, घनकचरा नियोजन, आरोग्यव्यवस्था, वाहतूक कोंडी, अर्धवट भुयारी गटार योजना, चोवीस तास पाणी योजना, वाढीव अन्यायी मालमत्ता कर, स्वच्छ व सुंदर भाजी मार्केट, पार्किंग व्यवस्था, चौक सुशोभीकरण असे अनेक प्रश्न उभे आहेत.
जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने पालिकेतील सत्ताकाळात शहराच्या विकासाला गती आणली. यामध्ये घरकुलांचा प्रश्न, शहराबाहेरील रस्ते, बगीचे, नाट्यगृह, प्रशासकीय कार्यालये आदींचा समावेश आहे; परंतु नियोजनाच्या अभाव दिसून येतो. गेली पाच वर्षे विकास आघाडीने सभागृहात फक्त सभा गाजवल्या आणि विरोधी राष्ट्रवादीने डोळ्यावर पट्टी बांधून सभापतीपदे सांभाळून तोरा मिरवला.
राज्यात महाआघाडीची सत्ता आल्यानंतर जयंत पाटील यांनी शहराच्या विकासाचा प्रश्न मार्गी लावण्याचा निर्धार केला आहे. येत्या निवडणुकीत पालिकेत कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी सत्तेत आली पाहिजे, यासाठी त्यांनी प्रयत्न चालविले आहेत. प्रत्येक प्रभागात जाऊन त्यांनी विकासाच्या आश्वासनांचा पाऊस पडला आहे.