दुधोंडी : दुधोंडी (ता. पलुस) भागातील कृष्णा नदी व परिसरातील जलसंपदा विभागांतर्गत येणारी विविध कामे तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले आहेत. येत्या काही महिन्यात यासाठी कोट्यवधींचा निधी मिळणार असल्याची माहिती कृष्णाकाठ उद्योग समूहाचे शिल्पकार जे. के. बापू जाधव यांनी पत्रकारांना दिली.
तालुक्यातील विविध कामांच्या पाठपुराव्यासाठी जे. के. बापू जाधव यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली. यावेळी मागणी केलेल्या सर्व कामांना मंजुरी देत संबंधित विभागांना निधी देण्याची ग्वाही जलसंपदा मंत्री पाटील यांनी दिली. यामुळे तालुक्यातील अनेक कामे मार्गी लागणार असल्याने येथील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
जे. के. बापू जाधव म्हणाले की, खोडिशी (ता. कराड) बंधाऱ्यातून कृष्णा कालवा सुरू होतो, तो वसगडेपर्यंत जातो. दुधोंडी गावालगत कृष्णा कॅनॉल जातो. या कॅनॉलमुळे शेकडो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. मात्र, या कॅनॉलची गळती होऊन बहुसंख्य शेतात पाणी साचून त्या जमिनी क्षारपड होत आहेत. तेथील पाणी निचरा करण्यासाठी अस्तरीकरण करणे गरजेचे आहे. तसेच या कॅनॉलच्या दोन्ही बाजूंनी रस्ता करावा, अशी मागणी केली आहे. कृष्णा कॅनॉल अंतर्गत जे पोट पाट आहेत त्यांचेही अस्तरीकरण व रस्ते व्हावेत, यासह अन्य मागण्या केल्या आहेत. त्यावर मंत्री पाटील यांनी तत्काळ निधी देण्याच्या सूचना संबंधित विभागांना देणार असल्याचे आश्वासन दिल्याची माहिती जे. के. बापू जाधव यांनी दिली.