मालगाव ग्रामपंचायत हद्दीत सुभाषनगरचा काही भाग येतो. सुभाषनगरसाठी तानंग प्रादेशिक योजनेतून पाणीपुरवठा होतो. पाण्याच्या टाकीपासून काही अंतरावर शिवशंकर काॅलनी आहे. येथे सुमारे ४० हून अधिक कुटुंबे वास्तव्यास आहेत. गेली ३० वर्षे येथे पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. स्थानिक पाणवठ्यावर ही कुटुंबे तहान भागवत आहेत. मात्र सध्या कडक उन्हाळ्यामुळे भूजल पातळी घटल्याने पिण्याच्या पाण्यासह जनावरांसाठीच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. कामधंदा सोडून तेथील ग्रामस्थांना पाणी मिळविण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. प्रत्येक वर्षी ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असतानाही येथे ग्रामपंचायतीच्या यापूर्वीच्या कारभारींनी पिण्याची पाणी व्यवस्था करण्याकडे दुर्लक्ष केल्याने कायमस्वरूपी पिण्याची पाणी व्यवस्था होऊ शकली नाही. शिवशंकर काॅलनी राजमाने प्लाॅट येथील तातडीने पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी सदाशिव दोडवाड, रवी घाटगे, रामेश्वर कुलकर्णी, सुनील चौगुले, बंडू पोतदार, बाबासाहेब कुलकर्णी यांच्यासह इतर ग्रामस्थांनी निवेदनाव्दारे मालगाव ग्रामपंचायतीकडे केली आहे.
सुभाषनगरमध्ये पाणी टंचाईने हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 4:26 AM