अंकलखोप :
कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून औदुंबर (ता. पलूस) येथील दत्तमंदिरामध्ये पाणी शिरले आहे.
कोयना धरण व कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रातील जोरदार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. गुरुवारी दुपारी दोन वाजता औदुंबर येथील दत्त मंदिरामध्ये पाणी शिरले आहे. रात्री उशिरा आमणापूर पूल पाण्याखाली गेला, तर शुक्रवारी सकाळपर्यंत भिलवडी येथील पाणी पातळी चाळीस फुटांवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, झपाट्याने वाढणारी पाणीपातळी पाहता कडेगाव प्रांताधिकारी गणेश मरकड, पलूसचे तहसीलदार निवास ढाणे, भिलवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कैलास कोडग, तलाठी गौसमहंमद लांडगे यांनी भिलवडी, अंकलखोप, सुखवाडी, चोपडेवाडी, नागठाणे या गावांना भेटी देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. संभाव्य पुराची शक्यता लक्षात घेऊन पूरग्रस्त भागातील लोकांना स्थलांतरित करण्यात येणारे ठिकाण व तिथे देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचीही पाहणी केली. पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत असून, नागरिकांनी सतर्क राहावे. शेती उपसा पंपाच्या कामानिमित्त शेतकऱ्यांनी नदीपात्रामध्ये उतरू नये, असे आवाहन इस्लामपूर पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता लालासाहेब मोरे यांनी केले आहे.