मिरज : तानंगसह सात गावांची नळपाणी पुरवठा योजना जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने घ्यावी, अन्यथा ही पाणी योजना ३ आॅगस्टपासून बंद करण्याचा फतवा जीवन प्राधिकरण विभागाने काढला आहे. हा निर्णय रद्द करून सुरळीत पाणी पुरवठा करावा, अन्यथा मिरजेतील जीवन प्राधिकरण विभागाच्या कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा काँग्रेस जिल्हा सरचिटणीस सुभाष खोत यांनी दिला आहे. तानंग प्रादेशिक योजनेत सावळी, कानडवाडी, सुभाषनगरसह ७ गावांचा समावेश आहे. सुमारे एक कोटीचा तोटा असल्याने ही योजनाच बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कुपवाड औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांच्या प्रदूषित सांडपाण्यामुळे सावळी, कानडवाडी, तानंगच्या विहिरी, कूपनलिकांचे पाणी खराब झाले आहे. पिण्याच्या पाण्याची अशी गंभीर परिस्थिती असताना, नळपाणी योजना बंद करण्याचा घाट घालण्यात आला आहे. जिल्हा परिषदेकडे ही योजना हस्तांतरित करून जबाबदारी टाळण्याचा प्रकार होत आहे. जीवन प्राधिकरण विभागानेच योजना चालवून थकित रक्कम माफ करावी. पावसाअभावी शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे आहे. योजनेचे पाणी बंद करून जखमेवर मीठ चोळण्याऐवजी पाणी योजना हस्तांतरणाची प्रक्रिया थांबवावी. पाणी पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा ३१ जुलैपासून मिरजेतील जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर विविध गावांतील पदाधिकाऱ्यांसह आंदोलन करणार असल्याचे खोत यांनी सांगितले. (वार्ताहर)तीन आॅगस्टची डेडलाईनतानंग, सावळी, कानडवाडी, सुभाषनगरसह सात गावांच्या प्रादेशिक नळ योजनेची एक कोटी रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीच्या वसुलीसाठी तीन आॅगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत थकबाकी जमा न झाल्यास योजनाच बंद करण्याचा फतवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने काढला आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी पळापळ करावी लागणार आहे.
सात गावांचे पाणी बंद होणार
By admin | Published: July 16, 2015 12:08 AM