सांगली : शहरातील शेरीनाल्याचे सांडपाणी पुन्हा एकदा कृष्णा नदीत मिसळू लागले आहे. मुख्य शेरीनाल्यासह बंधाºयाकडे सांडपाणी वाहून नेणारी गटार फुटल्याने कृष्णेच्या प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. महापालिकेने तातडीने गटारीची दुरूस्त करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, डेंग्यूच्या साथीने त्रस्त असलेल्या सांगलीकरांना सांडपाण्यामुळे साथीच्या आजारांना सामोरे जाण्याची भीतीही आहे.
शेरीनाल्यातील सांडपाणी धुळगावमधील शेतीला देण्याची योजना राबविण्यात आली. पण ही योजना आता फोल ठरली आहे. कृष्णा नदीकाठी बंधारा बांधून तेथून तीन मोटारींद्वारे सांडपाणी उचलण्यात येत होते. हे सांडपाणी वाहून नेण्यासाठी विष्णू घाटापर्यंत पाईपलाईन टाकण्यात आली आहे. तेथून मोठी गटार काढून त्यात पाणी सोडले जाते. हीच गटार फुटली असून, शेरीनाल्याचे पाणी थेट नदीपात्रात मिसळत आहे. त्यामुळे आयर्विन पूल ते विष्णू घाट, अमरधाम घाटमार्गे संपूर्ण सांडपाणी नदीत मिसळत होते. त्यात नदीत वाहते पाणी नाही. बंधाºयात पाणी अडविले असून, त्याच पाण्यात सांडपाणी मिसळत असल्याने नदी प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहे.
दुसरीकडे वसंतदादा स्मारकस्थळाजवळील मुख्य शेरीनालाही नदीपात्रात मिसळत आहे. या नाल्यातून मोठ्या प्रमाणात दूषित पाणी पात्रात जात आहे. महापालिका प्रशासनाकडून शेरीनाल्याच्या पलीकडेच कर्नाळ रस्त्यावरील जॅकवेलपासून पाण्याचा उपसा केला जातो. त्यामुळे शहराला दूषित पाणी मिळत नसल्याचा दावा केला जातो. पण नदीपात्रात पाणी साचून असल्याने या दूषित पाण्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होणार आहे.