ओळ : गुढे (ता. शिराळा) येथे चर खोदाईमुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोकरूड : खासगी माेबाइल कंपनीने पाचगणी ते आरळा रस्त्याच्या बाजूस खोदकाम केल्याने जलवाहिनी फुटल्याने गुढे (ता. शिराळा) परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नुकसान झालेले पाइप बदलून चरी बुजवाव्यात अन्यथा गुढे ग्रामपंचायतीच्या वतीने कारवाई करण्यात करण्यात येईल, असा इशारा सरपंच सखाराम दुर्गे यांनी दिला आहे.
गुढे-पाचगणी पठारावर एका खासगी माेबाइल कंपनीमार्फत पाचगणी ते आरळा मार्गावर केबलसाठी चरी काढण्यात आल्या आहेत. रस्त्याला लागून चरी काढल्याने वाहनधारकांचे हाल होत आहेत. त्यातच आठ दिवसांपूर्वी गुढे गावात चर काढत असताना विस्तारित नळ पाणीपुरवठा योजनेचे पाइप अनेक ठिकाणी फुटले. यामुळे ऐन उन्हाळ्यात ग्रामस्थांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. दोन दिवसांत चर भरून आणि पाइप बदलून देतो असे सांगणाऱ्या कंपनीच्या ठेकेदाराने अद्याप याची दखल घेतली नसल्याने ठेकेदारावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सरपंच दुर्गे यांनी सांगितले.