सांगली : मराठी नववर्षाच्या सुरुवातीला म्हणजे गुढीपाडव्याच्या सणादिवशी सांगली शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. उपनगरांसह गावठाणातही कमी दाबाने पाणीपुरवठा झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
सांगली शहरात ठिकठिकाणी गेली महिनाभरापासून अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात तक्रारी करूनही नागरिकांच्या समस्येत फारसा फरक पडलेला नाही. शहरातील गावभाग परिसरातही पहिल्या मजल्यावर पाणी जात नसल्याने अनेकांनी मोटारीचा वापर सुरू केला आहे. ज्यांच्याकडे मोटारी नाहीत त्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गणपती पेठ, गवळी गल्ली येथील परिस्थितीही तशीच आहे.
उपनगरांमध्ये सांगलीच्या पंचशीलनगर, लक्ष्मीनगर, शिवोदयनगर परिसरात गेल्या महिनाभरापासून अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे उपनगरांमध्येही लोक आता मोटारींचा वापर करून टाक्या भरू लागले आहेत. याबाबत पाणीपुरवठा विभागाकडे तक्रारी करूनही गेल्या महिनाभरात काहीही फरक पडलेला नाही. त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. गुढीपाडव्याच्या सणालाच या भागांमध्ये अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. त्यामुळे सण साजरा करण्याऐवजी पाण्यासाठी धावाधाव करण्याची वेळ नागरिकांवर आली.