विकास शहाशिराळा : शिराळा तालुक्यातील ४१ वाड्या, वस्त्या व गावामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी घोषित केली आहे. पिण्याच्या पाण्याचा पाणीटंचाई कालावधी हा एक जलवर्ष कालावधीसाठी असणार आहे. याचबरोबर कार्वे, रेठरे धरण या तलावात उपसाबंदी जाहीर केली आहे.
घोषित भागामधील समाविष्ट गावामध्ये कृषी आणि औद्योगिक वापरासाठी मनाई केली आहे. त्याचबरोबर ६० मीटरपेक्षा अधिक खोलीची विहीर, विंधन विहीर, कूपनलिका खोदण्यास मनाई केलेली आहे. टंचाईवर मात करण्यासाठी तसेच पुढील काळात सद्य:स्थितीत असलेल्या पाणीसाठ्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्याकरिता ८४ हातपंप व १६ सार्वजनिक विहिरी सार्वजनिक उद्भव व शासकीय अनुदानातून घेण्यात आलेल्या विहिरी, विंधन विहिरी उद्भवातील पाण्याची पातळी व असलेला साठा जतन करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या उद्भवालगत असल्याने खासगी उद्भव किंवा पाणीसाठे व नव्याने होणाऱ्या खोदकामास प्रतिबंध करण्यात आला आहे.सार्वजनिक विहिरी पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक उद्भवापासून एक हजार मीटर त्रिज्येच्या आत येणाऱ्या भागातील खासगी पाणीपुरवठ्यासाठी तसेच नव्याने उत्खनन करणेस व अस्तित्वात असलेल्या पाण्याचे पिण्याचे पाण्याव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी वापर करण्यावर प्रतिबंध करीत आहे. शासनाच्या आदेशानुसार पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य असल्याने टंचाई काळात उपसा बंदी केली अगर विहीर बोअर अधिग्रहण केल्यामुळे कोणत्याही व्यक्तीचे पाण्याअभावी पिकांचे अथवा कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास त्यास नुकसानभरपाई मागणी करता येणार नाही, असे आदेशात म्हटले आहे.
टंचाईग्रस्त वाडी, वस्ती, गावे पुढीलप्रमाणेसोनवडे (जळकेवाडी), आरळा (बेरडेवाडी), आरळा(येसलेवाडी), गुंडगेवाडी (करंगली), कोळेकरवाडी (मणदूर), सिद्धेश्वरबाडी (मणदूर), मिरुखेवाडी (मणदूर), जाधववाडी (मणदूर), सोनवडे (खोतवाडी), माळवाडी (सावंतवाडी), परीटकी वस्ती (सावंतवाडी), गवळेवाडी (कांबळेवाडी), प. त. शिराळा (कारंडेवाडी), मेणी (बौद्ध समाजवस्ती), करमाळे (यादव मळा), पुदेवाडी (बांबवडे), सावंतवाडी (सोनवडे), कोकणेवाडी (आरळा), दूरंदेवाडी उबरवाडी (कुसाईवाडी), भांडूगळेवाडी (आरळा), चिंचेवाडी, खराळे, वाकाईवाडी, खेड, बेलदारवाडी, रेड, सावंतवाडी, भैरववाडी, शिवारवाडी, बांबवडे, प. त. शिराळा, करमाळे, भटवाडी, शिरशी, ढोलेवाडी, भाटशिरगाव, कापरी, इंगरूळ, नाटोली, जांभळेवाडी, फकीरवाडी.
चांदोली धरण
- एकूण पाणीसाठा १५.४० टीएमसी(४४.७७ टक्के)
- ८.५२ टीएमसी (३०.९६ टक्के)
- विसर्ग - ३५० क्युसेक कालव्यामध्ये, नदीमध्ये १०१० क्युसेक असा एकूण १३६० क्युसेक.
- पाझर तलाव - १८ कोरडे व ३१ तलावात २५ ते ३० टक्के पाणीसाठा शिल्लक.