लोकमत न्यूज नेटवर्क
कोकरूड : ऐन पेरणीच्या दिवसात आणि पावसाळ्याच्या तोंडावर शिराळा तालुक्यातील येळापूरच्या जामदारवाडी-वाघमारेवाडीला पिण्याच्या पाण्याची समस्येने घेरले असून, कुटुंबातील सर्वांनाच पाण्याच्या शोधात वणवण फिरावे लागत आहे.
येळापूर ग्रामपंचायतीखाली जामदारवाडी, वाघमारेवाडीचा समावेश आहे. या दोन्ही वाडीत सार्वजनिक कूपनलिका आहे. मात्र गेल्या तीन-चार महिन्यांपासून पाणी येणे बंद झाले आहे. त्यातच या दोन वाडीसाठी असणाऱ्या विस्तारित पाणीपुरवठ्याची मोटारही खराब झाली आहे. वार्षिक पाणीपट्टी वेळेत भरूनही ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले असल्याने या दोन्ही वाड्यांवर पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. सार्वजनिक कूपनलिका आणि विस्तारित नळपाणीपुरवठा योजना बंद असल्याने खरीप हंगामातील शेतीच्या मशागतीला, पेरणीला वेग आला असतानाच या दोन्ही वाडीतील महिला-पुरुषांना पाण्याच्या शोधात वणवण फिरावे लागत आहे.
कोट
कूपनलिकेचे पाणी गेले आहे, तर नळपाणी पुरवठा योजना मोटारीअभावी बंद असल्याने लोकांना एकाएका घागरीसाठी सर्वत्र फिरावे लागत असल्याने कुटुंबातील सर्वांचा वेळ पाण्यासाठी जात आहे.
- शंकर वाघमारे, जामदारवाडी