सांगली : मागील आठवड्यात वरुणराजाने कृपादृष्टी केल्याने जिल्ह्यातील पाझर तलावाच्या पाणीसाठ्यात ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आणखी आठवडाभर असाच पाऊस राहिल्यास जिल्ह्यातील पाझर तलावांमध्ये ५० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मान्सूनच्या दमदार एन्ट्रीचा खरीप पेरणीला फायदा झाला असून, शेतकरी खरीप पेरणीसाठी सज्ज झाला आहे.जिल्ह्यात मध्यम प्रकल्प पाच आणि लघू प्रकल्प ७८, असे एकूण ८३ प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये सात हजार ७७५ दशलक्ष घनफूट पाणी साठ्याची क्षमता आहे. २९ मे २०२४ रोजी ८३ प्रकल्पांमध्ये एक हजार ४४ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. या पाण्याची टक्केवारी १३ होती. मागील आठवड्याभरात जिल्ह्यात जोरदार मान्सून पावसाचे आगमन झाले. दुष्काळी जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव तालुक्यासह सर्वच तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. यामुळे पाझर तलावांच्या पाणी साठ्यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. ८३ प्रकल्पांमध्ये सध्या एक हजार ४३४ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. मध्यम आणि लघू प्रकल्पामध्ये जवळपास ४ टक्के पाणीसाठा वाढून १७ टक्के झाला आहे. आणखी आठवडाभर असाच पाऊस पडत राहिल्यास जवळपास ५० टक्क्यांपर्यंत मध्यम आणि लघू प्रकल्प भरण्याची शक्यता आहे. पावसाची दमदार एन्ट्री झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी खरीप पेरणीच्या तयारीत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १०६.५ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
कोरड्यात तलावातही झाला पाणीसाठा२९ मे २०१४ च्या पाटबंधारे विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील २० पाझर तलाव कोरडे आणि २४ तलावांमध्ये मृत पाणीसाठा होता. सध्या १७ तलाव कोरडे असून, १९ तलावांमध्ये मृत पाणीसाठा आहे. कोरडे पडलेले तीन तलाव भरले असून, मृतसाठा असणाऱ्या पाच तलावांतही पाणी आले आहे.
जमिनीत ४ इंच ओल होऊ द्या.. मगच करा पेरणीयावर्षी मान्सून चांगला बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला होता. त्याप्रमाणे यंदाच्या पावसाळ्याचा ट्रेलरदेखील सांगली जिल्ह्यात चांगला पाहावयास मिळाला. मात्र, जमिनीत अजून तितका ओलावा झालेला नाही. जमिनीत ४ इंच ओल होऊ द्या आणि मगच पेरणी करा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी केले आहे.