सांगली : जत तालुक्याच्या पूर्व भागात आणि आटपाडी तालुक्यांच्या काही भागामध्ये रिमझिम पाऊस वगळता अद्यापही धुवाधार पाऊस झाला नाही. त्यामुळे पाणीटंचाई हटण्याचे काय नाव घेईना. परिणामी आजही २० गावांसह १२५ वाड्या-वस्त्यांवर २६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे, तर दुसरीकडे छोटे-मोठे पाझर तलाव, सिमेंट बंधारे अद्यापही कोरडेठाक पाहावयास वास्तव चित्र पाहवयास मिळत आहे.जून, जुलै हे दोन महिने संपून ऑगस्ट महिना निम्मा संपत आला तरी अद्याप जत तालुक्याच्या पूर्व भागामध्ये धुवाधार पाऊस झाला नाही. त्यामुळे पाझर तलाव, सिमेंट बंधारे, साखळी बंधारे कोरडेठाक आहे. रिमझिम पावसामुळे खरिपाची पिके चांगली आली आहे. जर धुवाधार पाऊस झाला नाही तर लवकरच भीषण पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होतोय की काय अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. जत तालुक्यातील १७ गावे आणि ९६ वाड्या-वस्त्यांवर २४ टँकरद्वारे आजही पाणीपुरवठा केला जात आहे.आटपाडी तालुक्यातील तीन गावे आणि २९ वाड्यांना दोन टँकरने पाणीपुरवठा होत आहे. जत, आटपाडी तालुक्यालाच दुष्काळ हटण्यासाठी धुवाधार पावसांची गरज आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने २० गावांसह १२५ वाड्या-वस्त्यांचे टँकर बंद होतील, अन्यथा पाऊस झाला नाहीतर तर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढावल्याशिवाय राहणार नाही.
या गावात आजही टँकरद्वारे पाणीपुरवठाजत तालुक्यातील सिंदूर, पांढरेवाडी, बसर्गी, सोन्याळ, गुगवाड, संख, उमराणी, मुचंडी, लमाणतांडा (दरिबडची), केरेवाडी (कोणत्याणबोबलाद), गोंधळेवाडी, खोजनवाडी, कुलाळवाडी, बेवनूर, उमदी, गुड्डापूर, उंटवाडी, आटपाडी तालुक्यातील पुजारवाडी, उंबरगाव, विभूतवाडी, दिघंची (वाड्यांसाठी) येथे आजही २६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
जत, आटपाडी तालुक्यात टंचाईस्थिती
- टंचाईग्रस्त गावे २०, वाड्या १२५
- टँकरची संख्या : १२६
- टंचाईग्रस्त लोकसंख्या : ५४१७३
- टंचाईग्रस्त पशुधन संख्या : १२४१४