शिराळा : इंगरुळ (ता.शिराळा) येथे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. चार दिवसांतून एकदा नागरिकांना पाणीपुरवठा होत आहे. शासनाने गावास पाणीटंचाई घोषित करून पाण्याचा स्रोत अधिग्रहण करून टँकरने पाणीपुरवठा करण्याची गरज आहे, अन्यथा १२ मे रोजी आंदोलन करणार आहे, असा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे नायब तहसीलदार सचिन कोकाटे यांच्याकडे केली आहे.
या निवेदनात म्हटले की, सध्या गावामध्ये विहिरीमधून सर्व गावसाठी पाणीपुरवठा केला जातो. विहीर ही ओढ्याकाठी असून, ओढ्याकाठी असणाऱ्या विहीर मालकांनी विहिरीकडे येणारे पाणी बाजूने पाणी विहिरीमध्ये घेतले आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यापासूनच पाण्याच्या विहिरीमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. फेब्रुवारी मध्यापासूनच पूर्ण गावाला चार दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत आहे. शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचे पाणी विहिरीमध्ये व पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये सरळ पाणी सोडले जाते. योग्य प्रकारे पाणी शुद्धीकरण यंत्रणा वापरली जात नसल्याने लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला.
या निवेदनावर सागर जंगम, विक्रम सुतार, निवास सरवदे, अरुण पाटील, विनायक गायकवाड, अरुण कांबळे, चंद्रकांत पाटील, दादासो कांबळे, संतोष कुंभार, विनायक पचुंब्रे, अक्षय पंडित, सूर्यकांत माने आदींच्या सह्या आहेत.