राष्ट्रीय पेयजल योजना रखडली असून, गावच्या आडातील पाण्याचे स्रोत आटत आहे. कूपनलिकांनाही पुरेसे पाणी नाही. याशिवाय जीवन प्राधिकरणाची पाणी पुरवठा योजना थकबाकीमुळे गेल्या दहा वर्षांपासून बंद आहे. याचा थेट परिणाम गावच्या पाणी पुरवठ्यावर झाला आहे.
विशेषतः याचा फटका महिलांना बसत असून, पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
गावापासून अवघ्या दीड किमी अंतरावर म्हैसाळ प्रकल्पाच्या मुख्य कालव्यातून पाणी वाहत आहे. याचा फायदा मात्र गावाला घेता येत नसल्याने ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे. म्हैसाळ
प्रकल्पाच्या कृष्णा खोरे विद्युत स्विच यार्डाला गावचे बारा एकर गायरान विनामोबदला दिले आहे. मात्र गावात आज प्रचंड पाणी टंचाई दिसत आहे.
याबाबत सरपंच राणी नागरगोजे यांना विचारले असता, गावच्या पाण्याचे स्त्रोतच कमी झाल्याने गावाला पाणी उशिरा मिळत असल्याचे त्यांनी मान्य केले.
ग्रामस्थांनीही आपली थकित पाणीपट्टी वेळेत भरल्यास कायमस्वरूपी उपाययोजना करता येतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.