विटा : विटा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था केलेल्या आळसंद (ता. खानापूर) येथील कोरड्या पडलेल्या तलावात बुधवारी ताकारी योजनेचे पाणी दाखल होताच आजी-माजी आमदार समर्थकांत श्रेयवादाची ठिणगी पडली. सोशल मीडियावर दोन्ही गट सक्रिय झाले आहेत.
मंगळवारी आ. अनिल बाबर यांनी आळसंद तलावाची पाहणी करून पाटबंधारे अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतल्यानंतर माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी तलावाची पाहणी करण्याचा केवळ फार्स असल्याची टीका आ. बाबर यांच्यावर केली. त्यामुळे आळसंदच्या तलावात सोडण्यात आलेले ताकारी योजनेचे पाणी पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
विटा नगरपरिषदेची घोगावच्या कृष्णा नदीतून पिण्याची पाणी पुरवठा करणारी योजना आहे. मात्र, तेथे काही बिघाड झाला तर पर्यायी व्यवस्था म्हणून आळसंद तलावातील जलशुद्धिकरण केंद्रात पाणी घेऊन तेथून शहराला पाणी पुरवठा केला जातो. परंतु, महिनाभरापासून घोगाव योजनेच्या जलवाहिन्यांना गळती असल्याने तसेच आळसंद तलावात पाणीसाठा नसल्याने शहरात टंचाई निर्माण झाली आहे.
त्यामुळे आळसंद तलावात ताकारीचे पाणी सोडणे गरजेचे होते. त्यासाठी आ. बाबर यांनी आळसंद तलावाची पाहणी करून पाटबंधारे अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी तत्काळ पाणी सोडत असल्याचे सांगितले. त्यानंतर माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी माजी आ. सदाशिवराव पाटील यांच्या विनंतीवरून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आदेश दिल्याने ताकारीचे पाणी आळसंद तलावात आल्याचे सांगितले. विरोधकांनी आळसंद तलावाची केलेली पाहणी केवळ फार्स असल्याची टीका केली.
ताकारीचे पाणी बुधवारी आळसंद तलावात दाखल झाले आहे. नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी ताकारी कालव्यातून पाणी येताना पुढे चालत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, तर माजी आ. पाटील समर्थक कार्यकर्त्यांनीही पालकमंत्र्यांमुळेच पाणी आल्याच्या पोस्ट टाकल्या आहेत.
त्यामुळे राजकीय श्रेयवादाला सुरुवात झाली आहे. मात्र, कोणामुळे पाणी आले यापेक्षा विटेकर नागरिकांची तहान भागणे महत्त्वाचे असल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून व्यक्त होऊ लागल्या आहेत.
फोटो - ०५०५२०२१-विटा-ताकारी पाणी : ताकारी योजनेच्या कालव्यातून बुधवारी ताकारी योजनेचे पाणी आळसंद तलावात दाखल झाले. त्यामुळे विटेकर नागरिकांसह आळसंद परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.