गजानन पाटील ल्ल संखकायम दुष्काळी असलेल्या जत तालुक्यात यंंदाही दुष्काळाचा वणवा भडकला आहे. पिण्याच्या पाण्याचे संकट उन्हाळाच्या वाढत्या उन्हाच्या झळांबरोबर दिवसेंदिवस वाढू लागले आहे. पूर्व भागात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. मुकी जनावरे, शेतकरी, उरली सुरली पिके या साऱ्यांची आता होरपळ सुरू आहे. सध्या ४० गावे व त्याखालील ३७५ वाड्या-वस्त्यांवर ४९ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. ३ शासकीय, ४६ खासगी टॅँकरने १ लाख २९ हजार ९१४ लोकांची तहान टॅँकरच्या पाण्याने भागविली जात आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार एप्र्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत उच्चांकी गावांना टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.दरम्यान, बागायतदार शेतकरी द्राक्षे, डाळिंब, फळबागांना टॅँकरने पाणी घालू लागला आहे. कूपनलिका व विहीर खुदाईची कामे जोरात सुरू आहेत. तालुक्यामध्ये दुष्काळ हा पाचवीला पूजलेला आहे. गेल्या पाच वर्षांपासून पाऊस अत्यल्प पडत असल्यामुळे पाण्याची पातळी १८०० फुटापर्यंत खाली गेली आहे. शेतीचे रब्बी व खरीप हंगाम वाया गेले आहेत. पाण्याअभावी डाळिंब, द्राक्षे, फळबागा वाळून गेल्या आहेत. तसेच गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विंधन विहिरीही पाण्याअभावी कोरड्या पडल्या आहेत. तालुक्यात यावर्षी एप्रिल महिन्यात ६५ गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. सध्या तालुक्यात टॅँकरची संख्या ४९ झाली आहे. कोंत्यावबोबलाद, दरीबडची, माडग्याळ, डफळापूर, बागलवाडी, तिकोंडी, उमदी, संख, वज्रवाड, उमराणी, डफळापूर वाडीवस्ती, दरीबडची, संख वाडीवस्ती, आसंगी, जत वाडीवस्ती, संख वाडीवस्ती, कुणीकोणूर, करजगी, बेळोंडगी, अंकलगी, मोटेवाडी, आसंगी तुर्क, कुडनूर, सोरडी, माडग्याळ वाडीस्ती, रावळगुंडवाडी, दरीकोणूर, वज्रवाड, सनमडी, एकुंडी, मुचंडी या प्रमुख गावांसह ४० गावे व ३७५ वाडी-वस्त्यांवर टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्यात १ लाख २९ हजार ९१४ लोक टॅँकरवर अवलंबून आहेत. पंचायत समितीने १२ टॅँकरचा प्रस्ताव तहसीलदारांकडे पाठविला आहे, तर १३ गावांनी नव्याने टॅँकरची मागणी केली आहे.टॅँकर भरण्याचे अंतर, विजेचे भारनियमन, तांत्रिक अडचण यामुळे दिवसभरातील टॅँकरच्या खेपा काही वेळा होत नाहीत. शासन माणसी २० लिटर पाणी मंजूर करत असले तरी, प्रत्यक्षात १५ किंवा १७ लिटर पाणी नागरिकांना मिळत आहे. उर्वरित पाणी मिळविण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाने ३१ मार्च २०१७ अखेरपर्यंत दोन कोटी ४३ लाख ५१ हजार रुपये प्रस्तावित असलेला संभाव्य टंचाई कृती आराखडा करून मान्यता घेतलेला होती. येथील शेतकऱ्यांनी बागायतदार शेतीही केली आहे. विकत पाणी आणून शेतकऱ्यांनी बागा जगवल्या आहेत. मात्र आता पाण्याची तीव्र टंचाई भासत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पाणी टंचाईमुळे परिसरात शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कूपनलिका व विहीर खुदाईची कामे जोरात सुरू आहेत.मूक जनावरांचे हाल तालुक्यात पशुपालकांची संख्या मोठी आहे. ६ लाख जनावरे आहेत. शासनाने माणसी वीस लिटर याप्रमाणे टॅँकर सुरू केले आहे. मात्र त्यात जनावरांचा समावेश नाही. त्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या वैरणीचीही टंचाई आहे.
जत तालुक्यातील ४० गावांत टॅँकरने पाणी
By admin | Published: April 23, 2017 11:54 PM