लोकमत न्यूज नेटवर्क
कोकरूड : राज्य मार्गाच्या ठेकेदारांकडून खुजगावसह विविध गावांत पाणीचोरी सुरूच असून, वारणा डाव्या कालव्यातूनही उपसा होत असल्याचे पुरावे देऊन शिवसेनेचे राज्य युवासेना विस्तारक किरण सावंत यांनी तक्रार केली होती. मात्र, सावंत मुंबईला परतले आणि पुन्हा तोच खेळ सुरू झाला आहे.
शिराळा ते कोकरूड आणि कऱ्हाड ते कोकरूड या राज्य मार्गाच्या रुंदीकरणाचे आणि डांबरीकरणाचे काम सुरू आहे. या मार्गासाठी दररोज २५ ते ३० लाख लिटर पाणी उपसा केला जात आहे. कोणतीही परवानगी न घेता चार महिन्यांपासून दोन्ही ठेकेदार विविध गावांतील पदाधिकारी, कार्यकर्ते यांना हाताशी धरून पाणी उपसा करीत आहेत. पाटबंधारे विभागाच्या काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून शासनाची फसवणूक करीत आहेत. दुसरीकडे शेतकऱ्यांना कारवाईची भीती दाखवून पाणीपट्टी बसवीत आहेत. ही माहिती राज्य युवासेना विस्तारक किरण सावंत यांना समजल्यानंतर यांनी तहसीलदार, पाटबंधारे विभाग यांच्याकडे लेखी निवेदन दिले. फोटो, व्हिडिओ यासारखे पुरावे दिले. पाठपुराव्याची दखल प्रशासनाने घेतल्याने पाणी चोरीस लगाम बसला. सिंचन विभागाकडील एका कर्मचाऱ्याची दिवस-रात्र ड्यूटी लावण्यात आली होती. मात्र, सावंत मुंबईला परतल्यानंतर ठेकेदाराने पुन्हा पाणी चोरी सुरू केली आहे. यावर अधिकाऱ्यांनी मौन धारण केले आहे.