लोकमत न्यूज नेटवर्क
संख : कर्नाटकातील तुबची-बबलेश्वर योजनेतील पाणी कनमडी तलावातून जत पूर्व भागातील बोर नदीला दरी ओढ्यातून कोणताही खर्च न करता
नैसर्गिक उताराने आले आहे. सिद्धनाथ तलाव, संख मध्यम प्रकल्प, बोर ओढापात्रातील सिमेंट बंधारे, कोल्हापूर बंधारे भरणार आहेत. साठवण क्षमता ७५२.२१ दशलक्ष घनफूट इतकी आहे. ही योजना अव्यवहार्य नसून, पाणी येऊ शकते, हे सिध्द झाले आहे.
पूर्व भागातील वंचित ६७ गावांसाठी तुबची-बबलेश्वर अत्यंत उपयुक्त योजना आहे. योजनेचा प्राथमिक आराखडा तत्कालीन पालकमंत्री पतंगराव कदम, आमदार विक्रम सावंत यांंनी २०११ला कर्नाटक शासनाला सादर केला होता. तत्कालीन जलसंपदा मंत्री एम. बी. पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. गेल्या १५ वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. सीमावर्ती भागात योजनेेेचे पाणी बंदिस्त वितरकेतून ३.८ टीएमसी उचलले जाणार आहे. तिकोटा, जालगिरी, समुद्रहट्टी, घोणसगी या भागातील कामे पूर्णत्वाच्या टप्प्यावर आहेत. या योजनेचा शेवटचा चेंबर बाबानगर आहे.
नैसर्गिक उताराने पाणी भिवर्गी, तिकोंडी नं १, तिकोंडी नं २, जालिहाळ बुद्रुक, पांडोझरी, आसंगी तुर्क या ६ तलावांत ७०१ दशलक्ष घनफूट पाणीसाठा करता येईल. जालेगिरी ओढापात्रातून तिकोंडी क्र २ भिवर्गी तलावातून करजगी, बोर्गी, बेळोंडगी, बालगाव, हळ्ळी, सुसलाद, सोनलगीला पाणी गेले आहे. या योजनेचा ४२ हजार हेक्टर क्षेत्राला लाभ होईल. पाणीप्रश्न कायम सुटण्यास मदत मिळणार आहे. त्यासाठी आंतरराज्य पाणी करार होणे आवश्यक आहे. यासाठी पक्षभेद विसरून राजकीय पाठबळ व पाठपुराव्याची गरज आहे.
कोट
तुबची-बबलेश्वर योजनेचे पाणी येऊ शकते, हे सिध्द झाले आहे. तांत्रिक अडचण दूर करून योजनेचा पुनर्विचार करावा, या मागणीचे पत्र जलसंपदा विभागाचे सचिव यांना दिले आहे. - विक्रम सांवत, आमदार