सदानंद औंधे ।लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : एकेकाळी शेकडो कारागीर असलेल्या मिरजेत आता हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच तांब्या, पितळेची भांडी घडविणारे तांबट या नावाने ओळखले जाणारे कारागीर शिल्लक राहिले आहेत. महागाईमुळे स्टील व प्लास्टिकच्या भांड्यांचा वापर वाढल्याने तांबट बेरोजगार झाले आहेत. तांबा-पितळेच्या भांड्यांची क्रेझ पुन्हा वाढत असताना तांबट व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे.मिरजेत कमानवेस परिसरात तांबट मंडळींचा भांडी ठोकण्याचा आवाज सर्वांनाचा परिचयाचा होता. तांबा, पितळ व अॅल्युमिनियमची भांडी हाताने ठोकून कारागीर घडवित असत. ऐरणीवर पातेले, घागर, हंडा यासह मोठ्या आकाराची भांडी ठोकून चमकविण्यात येतात. भांड्यावर घणाचे, हातोडीचे घाव घालून भांडे घडविण्याचे काम खरोखर कष्टाचे आहे. कारखान्यातून तयार केलेली भांडी घडविण्यासाठी कारागीरांकडे येतात.तांबा व पितळ हे धातू स्वस्त असताना मिरजेतील कारागीरांचा व्यवसाय जोमात होता; मात्र गेल्या दशकात तांबा व पितळेची किंमत वाढल्याने पातेले, घागर, हंडा अशा भांड्यांची मागणी कमी झाली. स्टील व प्लास्टिकच्या स्वस्त भांड्यांचा वापर वाढल्याने तांबट कारागीरांच्या व्यवसायावर संक्रांत आली आहे.तांबा व पितळ या धातूची किंमत प्रतिकिलो सहाशे रुपयांवर गेली आहे. यामुळे दोन हजार ते दहा हजार रुपये किमतीची तांबा, पितळेची भांडी परवडत नसल्याने, स्टीलच्या स्वस्त भांड्यांचा, अॅल्युमिनिअमच्या मोठ्या भांड्यांचा वापर होत आहे. गरीब कुटुंबांमध्ये प्लास्टिक घागरींचा वापर होतो. त्यामुळे काम अत्यल्प उरल्याने तांबट कारागीरांचा व्यवसाय संपला आहे. मिरजेतील कमानवेस परिसरात आता केवळ चारच कारागीर शिल्लक आहेत. तांब्या-पितळेच्या भांड्यांना कल्हई करणारा तर मिरजेत एकच कारागीर आहे.बेरोजगार झालेले अनेक कारागीर औद्योगिक वसाहतीत कामाला जात आहेत. कारागीरांची मुलेही परंपरागत व्यवसायाऐवजी अन्य व्यवसाय करीत आहेत. सुमारे ३० ते ४० वर्षे तांबट काम करणारे कारागीर आजही हलाकीत जगत आहेत. तांबट कारागीरांना शासनाकडून मदतीची अपेक्षा कारागीर फिरोज बैरागदार व महंमदहनिफ पठाण यांनी व्यक्त केली.तक्रारीमुळेही अडचणी!चहाच्या दुकानात पितळेच्या भांड्यांचा वापर सुरू झाल्याने पुन्हा तांबा-पितळेच्या भांड्यांची क्रेझ निर्माण होत आहे. मात्र तांबा, पितळेची भांडी घडविणारे कारखाने व कारागीर मोठ्याप्रमाणात असलेल्या कर्नाटकातील नसलापूर या गावातून भांडी तयार होऊ लागल्याने स्थानिक कारागीरांच्या हाताला काम उरलेले नाही. भांडी ठोकण्याच्या आवाजाबद्दल होणाऱ्या तक्रारींमुळेही हा व्यवसाय अडचणीत आला आहे.
मिरजेत तांबट व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:00 AM