सांगली : "आमच्या नावे शेती आहे. आम्ही पूर्वापर शेती करतो. त्यामुळे आम्हीदेखील कुणबीच आहोत. आम्हालाही कुणबी प्रमाणपत्र द्या," अशी मागणी सकल लिंगायत मोर्चाने केली आहे. गुरुवारी त्यांनी सांगलीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ही मागणी केली.
कुणबी प्रमाणपत्रासाठी लिंगायत समाजही आग्रही झाल्याने शासनाची कोंडी होण्याची चिन्हे आहेत. भविष्यातील आक्रमक आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून लिंगायत मोर्चाने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, लिंगायत समाज कष्टकरी असून शेकडो वर्षांपासून शेती करत आहे. त्यामुळे आमचा समावेश इतर मागास प्रवर्गात करावा. लिंगायतातील सर्वच समाजघटक इतर मागास प्रवर्गात समाविष्ट नाहीत. मात्र ते पिढ्यानपिढ्या शेती करत असल्याने कुणबी प्रवर्गासाठी पात्र आहेत. त्यांचा सरसकट समावेश कुणबी म्हणून इतर मागास प्रवर्गात करावा.
शासनाच्या अभिलेखात तसा उल्लेख नसल्याने इतर मागास दाखले मिळत नाहीत. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा फायदा घेता येत नाही. शासनातर्फे सध्या मराठा कुणबी नोंदींची शोध मोहीम सुरु आहे. त्यावेळी लिंगायत कुणबी, कुणबी लिंगायत, कुणबी माळी, तेली कुणबी, कुंभार कुणबी, सुतार कुणबी, कोळी कुणबी, साळी कुणबी, लोहार कुणबी अशा नोंदीही सापडत आहेत. त्यामुळे हे सर्व समाजघटक कुणबी प्रमाणपत्रासाठी आणि पर्यायाने इतर मागास प्रवर्गासाठी पात्र आहेत. त्यांचा सरसकट समावेश इतर मागास प्रवर्गात करावा.
दरम्यान, निवेदन देण्यासाठी सकल लिंगायत मोर्चातर्फे रमेश कुंभार, गजानन अडीमनी, सुरेंद्र बोळाज, राजेश साबणे, पंचाक्षरी बोळाज, राजशेखर बोळाज, जयराज सगरे, विश्वनाथ महाजन, रोहित हेडदुगी आदी उपस्थित होते.