अशोक पाटील इस्लामपूर : आगामी विधानसभा निवडणूक शिराळा मतदारसंघातून लढविण्यावर मी ठाम आहे. कार्यकर्त्यांचा विचार घेऊनच या निर्णयावर एकमत झाले आहे. शिवाजीराव देशमुख यांना आदरांजली म्हणून वाळवा-शिराळ्यातील आघाडीच्या नेत्यांनी माझ्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा. तसे न झाल्यास आम्ही वेगळा विचार करणार आहे. आता आमचं ठरलंय, असे आव्हान सत्यजित देशमुख यांनी लोकमतशी बोलताना काँग्रेस आघाडीला दिले आहे.देशमुख म्हणाले की, २००९ च्या विधानसभा निवडणुकीत आम्ही आघाडीचा धर्म पाळून राष्ट्रवादीचे उमेदवार मानसिंगराव नाईक यांना सहकार्य करून विजयी केले. आताच्या लोकसभा निवडणुकीतही ह्यस्वाभिमानीह्णच्या राजू शेट्टी यांच्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळेच शिराळा मतदार संघात चांगले मताधिक्य मिळाले आहे.
आता आघाडीतील नेत्यांनी काँग्रेसचा विचार करावा. जिल्ह्यात काँग्रेसची पीछेहाट झाली असली तरी, शिराळा मतदार संघातील काँग्रेसची ताकद आजही अबाधित आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांवरही काँग्रेसचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांचा शब्द मानला आहे. तसेच आघाडीचा निर्णयही नेहमीच पाळत आलो आहे. पण त्यामुळेच आमच्यावर अन्याय झाला आहे.
यावेळी मात्र आघाडीचे नेते जयंत पाटील यांनी मोठ्या मनाने हा मतदारसंघ काँग्रेसला सोडून आमचा विचार करावा. ही शिवाजीराव देशमुख यांना श्रध्दांजली ठरणार आहे. मात्र वेगळा विचार झाल्यास आमचं ठरलंय की, यंदाची निवडणूक लढवायचीच.