इस्लामपूर : काँग्रेस आघाडीला गेल्या १५ वर्षांत जे जमले नाही, ते आम्ही केवळ पाच वर्षांत करून दाखवले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील डझनभर मंत्री निष्क्रिय ठरले असल्याचा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. शिराळा मतदारसंघात आता आमची ताकद ‘डबल’ झाली आहे. त्यामुळे येथील आमचा विजय निश्चित आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कामेरी (ता. वाळवा) येथे शिराळ्यातील भाजपचे उमेदवार आमदार शिवाजीराव नाईक, इस्लामपूर मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार गौरव नायकवडी यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजयकाका पाटील, आमदार प्रसाद लाड, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार भगवानराव साळुंखे, सत्यजित देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शिराळा तालुक्यातील सिंचन योजनेला लागेल तेवढा निधी देणार आहोत.
आमदार नाईक यांच्या पाठपुराव्यामुळेच ही योजना आता अंतिम टप्प्यात आली आहे. ही योजना युतीच्या काळात सुरू झाली आणि ती आम्हीच पूर्ण करणार आहोत. आमचे सरकार आल्यानंतर चांदोली अभयारण्याला पर्यटनाचा दर्जा देणार आहोत. कोकरुड परिसरात सभापती दिवंगत शिवाजीराव देशमुख यांचे भव्यदिव्य स्मारक उभा करून सत्यजित देशमुख यांना दिलेला शब्द पाळणार आहे. हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचे स्मारक तसेच त्यांच्या नावाने कुस्ती प्रशिक्षण केंद्र पुनवत येथे उभारू.
आ. नाईक म्हणाले, शिवाजीराव देशमुख माझे गुरू आहेत. त्यांच्याच तालमीत राजकारणाचे धडे शिकलो. आता त्यांचे चिरंजीव सत्यजित माझ्या सोबतीला आल्याने माझी ताकद दुप्पट झाली आहे.आनंदराव पाटील यांनी आभार मानले. यावेळी सम्राटसिंह शिंदे, सी. एच. पाटील, अशोक जाधव, संपतराव देशमुख, राजाराम गरुड यांनी मनोगत व्यक्त केले. भाजपचे तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उदयसिंह नाईक, वैभव शिंदे, पृथ्वीराज पवार, रणधीर नाईक, वैभव शिंदे उपस्थित होते.
शब्द पाळणारसत्यजित देशमुख यांना विधानपरिषदेत पाठविण्याचा दिलेला शब्द पाळणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. यावेळी उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजी केली.