मिरज : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी देशाप्रती केलेले कार्य कोणीही नाकारु शकत नाही. स्वातंत्र्य लढ्यातील घेतलेला पुढाकार कोणीही विसरु शकत नाही. त्यांना भारतरत्न देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करावा, अशी मागणी 'आम्ही शिवभक्त' संघटनेच्यावतीने करण्यात आली.
संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र पाठविले आहे. संघटनेचे विकास सूर्यवंशी, सुधाकर धोंगडे, संदीप शिंदे, रोहित चौगुले यांनी याबाबत मिरज तहसिलदारांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, सावरकर एकमेव असे स्वातंत्र्ययोध्दा आहेत, ज्यांनी दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा भोगली. असे भारतीय विद्यार्थी आहेत, ज्यांनी इंग्लंडच्या राजाप्रती निष्ठा असण्याची शपथ घेण्यास नकार दिला.
परिणामी त्यांना वकालत करता आली नाही. स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्याने ब्रिटीश सरकारने त्यांची पदवी काढून घेतली. बंदीजीवन समाप्त होताच त्यांनी अस्पृश्यता आणि कुप्रथा बद्दल आंदोलन सुरु केले. त्यामुळे सावरकरांना भारतरत्न देण्यात यावा, अशी आमची आग्रही मागणी आहे.