जत : शिक्षकांना दिली जाणारी अशैक्षणिक कामे, कॅशलेस विमा आरोग्य योजना
व शिक्षकांच्या विनंती बदल्या याबाबत राज्य स्तरावर प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यासाठी संबंधित खात्याचे मंत्री व शिक्षक भारतीचे पदाधिकारी यांची संयुक्तिक बैठक घेऊ, असे आश्वासन आमदार विक्रम सावंत यांनी दिले.
सांगली जिल्हा शिक्षक भारतीतर्फे देण्यात येणारा सावित्री फातिमा आदर्श शिक्षिका पुरस्कार वितरण सोहळा आमदार विक्रम सावंत यांच्याहस्ते जत येथे झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती आशाताई पाटील, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, उपसभापती विष्णू चव्हाण, शिक्षण व आरोग्य सभापती भुपेंद्रा कांबळे, कृष्णा पोळ कादर आत्तार उपस्थित होते.
जिल्हा अध्यक्ष महेश शरनाथे म्हणाले की, राज्यस्तरावरील कॅशलेस विमा आरोग्य योजना, शिक्षकांसाठी राबविण्यात येणारे बदली धोरण, शिक्षकांना दिली जाणारी अशैक्षणिक कामे व जिल्हा परिषद स्तरावर प्रलंबित असणारी पेन्शन प्रकरणे, गटविमा प्रकरणे, फंडाची प्रकरणे, मेडिकल बिले यासंदर्भात शिक्षण सभापती यांनी लक्ष घालून प्रलंबित प्रश्न निकाली काढावेत. जिल्हा परिषद शिक्षण कमिटीवर शिक्षक भारती संघटनेला प्रतिनिधित्व द्यावे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जत तालुका शिक्षक भारतीचे अध्यक्ष दिगंबर सावंत यांनी केले. मल्लया नांदगाव, नवनाथ संकपाळ, जितेंद्र बोराडे, अविनाश सुतार, विनोद कांबळे, बाळासाहेब सोलनकर, रावसाहेब चव्हाण, जयानंद तुंगल, सिद्राम देसाई, धानापा कमते व सर्व तालुका पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. भाऊसाहेब महानोर यांनी आभार मानले.
फोटो : ०७ जत १