सांगली : महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडणुकीत भाजपमधून फुटलेल्या सहा नगरसेवकांच्या अपात्रतेबाबत भाजपकडून पुणे विभागीय आयुक्तांकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही भाजपचे नेते ॲड. आशिष शेलार यांनी दिली. भाजप शहर जिल्हा कार्यकारिणीच्या कामकाजाचाही त्यांनी आढावा घेतला.
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, खासदार संजय पाटील, आमदार सुरेश खाडे, माजी आमदार दिनकर पाटील, माजी आमदार नितीन शिंदे, भाजपचे नेते शेखर इनामदार, मकरंद देशपांडे, नीता केळकर, मुन्ना कुरणे, स्थायी समितीचे सभापती पांडुरंग कोरे, सभागृह नेते विनायक सिंहासने उपस्थित होते.
फेब्रुवारी महिन्यात झालेल्या महापौर निवडीवेळी भाजपच्या महेंद्र सावंत, स्नेहल सावंत, अपर्णा कदम, नसिमा नाईक या चार नगरसेवकांनी ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’च्या उमेदवारांना मतदान केले, तर आनंदा देवमाने, शिवाजी दुर्वे हे दोन नगरसेवक अनुपस्थित राहिले. त्यामुळे भाजपचा पराभव झाला. भाजपने या फुटीर नगरसेवकांविरोधात अपात्रतेसाठी पुणे विभागीय आयुक्तांकडे अर्ज सादर केला आहे. मात्र, अद्याप फुटीर नगरसेवकांना पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून साधी नोटीसही दिलेली नाही. याकडे भाजपच्या जिल्हा नेत्यांनी शेलार यांचे लक्ष वेधले. त्यावर फुटीर नगरसेवकांच्या अपात्रतेसंदर्भात प्रदेश भाजपस्तरावरून पाठपुरावा केला जाईल. अपात्रतेसंदर्भातील कार्यवाही गतीने होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे शेलार यांनी सांगितले.