खानापूर : खानापूर नगरपंचायतीने अल्पावधित विकासकामांचा केलेला पाठपुरावा प्रशंसनीय आहे. उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी मागेल तेवढा निधी देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार राज्यमंत्री यांनी येथे केले.
नगरपंचायतीने सुरू केलेल्या तीन कोटी ८२ लाख रुपयांच्या २९ विकासकामांचा प्रारंभ कदम यांच्याहस्ते नुकताच करण्यात आला. याप्रसंगी आमदार अनिल बाबर, माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे, जिल्हा परिषद सदस्या नीलम सकटे, नगराध्यक्ष तुषार मंडले, उपनगराध्यक्ष ज्ञानदेव बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कदम म्हणाले की, सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवसात चार कोटींच्या कामांचा प्रारंभ करणारी खानापूर नगरपंचायत राज्यातील एकमेव नगरपंचायत असेल.
आमदार बाबर म्हणाले की, खानापूरच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वप्रथम विकास आराखडा तयार करणे गरजेचे आहे. नगरपंचायत इमारतीसाठी दोन कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
तरुणांना काम मिळण्यासाठी खानापूरला एमआयडीसी मंजूर करण्याची मागणी सुहास शिंदे यांनी केली.
कार्यक्रमास विट्याचे माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष बापूराव शिंदे, जयदीप भोसले, गणपतराव भोसले, कृष्णदेव शिंदे, दादासाहेब पाटील, डॉ. उदय हजारे, हर्षवर्धन माने, लालासाहेब पाटील, राजेंद्र शिंदे, राजन पवार, दादा भगत उपस्थित होते.
मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांनी स्वागत, तर धीरज भिंगारदेवे यांनी सूत्रसंचालन केले. गटनेत्या मंगल मंडले, सभापती भारत सरगर, नूतन टिंगरे, उमेश धेंडे, डॉ. वैशाली हजारे, सुरेखा डोंगरे यांनी नियोजन केले.