इस्लामपूर : पालिकेच्या गाळे लिलाव प्रक्रियेत मूळ गाळेधारकांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. त्यासाठी कायद्याच्या चाकोरीत शक्य असेल ती सर्व मदत सभागृहाच्या मान्यतेने केली जाईल. त्यामुळे कोणतीही भीती न बाळगता गाळेधारकांनी लिलाव प्रक्रियेत सहभाग घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी केले.
येथील पालिकेच्या नाट्यगृहात सर्व गाळेधारकांची बैठक झाली. यावेळी विक्रम पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, शकील सय्यद, अमित ओसवाल, गजानन फल्ले, सागर मलगुंडे उपस्थित होते.
पाटील म्हणाले, ही संपूर्ण प्रक्रिया प्रशासकीय आहे. आम्ही सत्तेत येण्यापूर्वी असणाऱ्या सभागृहाने अनामत आणि भाडेवाडीचा ठराव केला आहे. त्यानंतर उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ही प्रक्रिया सुरू ठेवण्याची शिफारस करणारा ठराव शहाजी पाटील यांच्या सूचनेने झाला. यात आम्हाला राजकारण आणण्याची इच्छा नाही. मूळ गाळेधारकांना प्राधान्याने गाळे मिळतील, असा ठराव आहे. काही लोकांना प्रश्न वाढविण्यात हौस असते, त्यामुळे तुम्ही इकडे-तिकडे करू नका.
विक्रम पाटील म्हणाले, यापूर्वी विरोधात असताना आम्ही गाळेधारकांना मदत केली आहे. आता सत्तेत आहोत. त्यामुळे मदतच करू. फक्त ती कायद्याच्या चाकोरीत राहून कोणालाही त्रास होणार नाही यापद्धतीने करू. मात्र गाळ्यांचा पोटभाडेकरू ठेवून व्यवसाय करणाऱ्यांना मदत करणार नाही.
आनंदराव पवार म्हणाले, तुमच्या अडचणीबाबत निवेदन द्या. पालिकेची विशेष सभा बोलावून सर्वानुमते निर्णय घेत गाळेधारकांना सवलत देण्याचा प्रयत्न करू.
प्रसाद नलवडे, अनिस मोमीन, अरविंद पाटील, अधिक पाटील व इतर गाळेधारकांनी व्यथा मांडल्या.