सांगली : अन्न व औषध प्रशासनाकडून जिल्ह्यातील पानचालकांवर कारवाई सुरू आहे. त्यांची दुकाने सील करण्यात आली आहेत. ही अन्यायकारक कारवाई थांबवावी, अशी मागणी सांगली जिल्हा पान असोसिएशनच्यावतीने रविवारी अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे करण्यात आली. पाटील यांनी पानपट्टीचालकांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली.
संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजित सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष रत्नाकर नांगरे, युसुफ मेस्त्री, मकरंद जमदाडे यांच्या शिष्टमंडळाने मंत्री पाटील यांची भेट घेतली. राज्यात गुटखाबंदी असली तरी परराज्यातून गुटख्याची तस्करी होत आहे. बड्या व्यापाऱ्यांवर कारवाई होत नाही. पानपट्टीचालकांवर बडगा उगारला जात आहे. पान दुकान बंद करणार असाल तर आमच्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरीत घ्यावे, दुसरा व्यवसाय करण्यास बिनव्याजी २० लाख रुपये द्यावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी एकनाथ सूर्यवंशी, राजू पागे, विजय पाटील, अंकुश पाटील, मयूर बांगर, प्रवीण उपाध्ये उपस्थित होते.